मुंबई : भाजपाबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटी फिसकटल्याने अखेर विरोधी बाकावर बसावे लागल्याने डोक्यावर लाल दिवा येण्याची स्वप्ने पाहणा:या शिवसेनेतील काही नेत्यांची माथी संतापाने लालेलाल झाली आहेत. त्याचाच भडका मंगळवारी उडाला. विधान परिषदेचे सदस्य रामदास कदम हे राज्यसभेचे सदस्य अनिल देसाई यांच्या अंगावर धावून गेल्याचे कळते. गेली 25 वर्षे मी विधिमंडळात आहे, शिवसेनेकरिता वार ङोलले आहेत. तुम्ही गेल्या दोन महिन्यांत काय केले ते सांगा, असे सांगणा:या कदमांचा रुद्रावतार पाहिल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोटारीत बसून थेट मातोश्री गाठले.
भाजपाने मंगळवारी अचानक दिवाकर रावते व रामदास कदम यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बोलावून मंत्रिपदाच्या वाटाघाटी सुरू केल्या. अरुण जेटली यांचे फोन देखील मातोश्रीवर सुरू झाले. त्यामुळे सायंकाळी आमदारांच्या बैठकीकरिता उद्धव ठाकरे जेव्हा शिवालयात दाखल झाले तेव्हा त्यांनी रावते-कदम यांच्यासोबत वाटाघाटींसंदर्भात चर्चा केली. त्या वेळी सुभाष देसाई व अनिल देसाई हे हजर होते. चर्चेच्या प्रक्रियेमध्ये यापूर्वी काय झाले होते ते सांगण्याचा प्रयत्न अनिल देसाई यांनी करताच कदम भडकले. गेले दोन महिने तुम्ही काय करताय? मी गेली पंचवीस वर्षे विधिमंडळाचा सदस्य आहे. तुम्ही मला काय ‘प्रोसेस’ सांगताय, अशा शब्दांत कदम यांनी फैलावर घेतले. कदम हे आता देसाई यांच्या अंगावर धावून जातील की काय, असा एकूण नूर होता.
लागलीच उद्धव ठाकरे यांनी काढता पाय घेतला आणि ते मोटारीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले.