...अन् एकाच क्रमांकाच्या दोन वाहनांचे गुपित उलगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:25 AM2018-06-15T05:25:06+5:302018-06-15T05:25:06+5:30
सर्व नियम पाळूनही पोलिसांच्या कारवाईला तोंड द्यावे लागत असल्याने तक्रारदाराने पंतनगर पोलीस ठाणे गाठल्याने पोलीसही चक्रावले. अशा तक्रारींत भर पडल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. आणि एकाच क्रमांकाच्या दोन वाहनांमागे लपलेल्या मॅकेनिक नासीर शेखचा पर्दाफाश केला.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : सर्व नियम पाळूनही पोलिसांच्या कारवाईला तोंड द्यावे लागत असल्याने तक्रारदाराने पंतनगर पोलीस ठाणे गाठल्याने पोलीसही चक्रावले. अशा तक्रारींत भर पडल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. आणि एकाच क्रमांकाच्या दोन वाहनांमागे लपलेल्या मॅकेनिक नासीर शेखचा पर्दाफाश केला. तो जुन्या गाड्या विकत घेत असे. त्यानंतर चोरीच्या वाहनांचे इंजिन क्रमांक, चॅसीस क्रमांक पंचिंग करून त्या दुचाकी मूळ कागदपत्रांसह विकत असे. त्याच्याकडून पंतनगर पोलिसांनी १३ गुन्ह्यांची उकल केली.
अशा स्वरूपाच्या क्लिष्ट गुन्ह्यांसह विविध घटनांचा पंतनगर पोलीस उलगडा करताना दिसतात. १९८७मध्ये पंतनगर पोलीस ठाण्याची स्थापना झाली. अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यापैकी हे एक पोलीस ठाणे मानले जाते. सुमारे ७ लाख लोकवस्ती असलेला हा परिसर हिंदूबहुल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १८३ पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस ठाण्याअंतर्गत गारोडीया नगर, कामराज नगर, टिळक नगर, रमाबाई आंबेडकर नगर, लक्ष्मी नगर या संवेदनशील ठिकाणांसह बेस्ट कॉलनी, रेल्वे पोलीस कॉलनी हे भाग येतात. कुठल्याही घटनेचे पहिले पडसाद या भागात उमटतात. त्यामुळे येथील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचे प्रमुख आव्हान पोलिसांवर असते.
कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर सर्वांत आधी रमाबाई कॉलनीतून पडसाद उमटले. दोन दिवस रस्ता बंद होता. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त आणि चर्चा करून त्यास हिंसक वळण लागू दिले नाही.
महिला पोलिसांसाठी पुढाकार
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रोहिणी काळे यांनी पंतनगर पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून धुरा हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिले महिला पोलिसांच्या मूलभूत सुविधांवर भर दिला. शिवाय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी त्यांची बैठक घेऊन कौतुक करणे, त्यांचा वाढदिवस साजरा करतात.
सार्वजनिक सभांवर भर
‘स्ट्रिट क्राईम’ नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी मोक्याच्या ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त वाढवला. तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी संवाद साधणे, सोनसाखळी चोरीसह वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची धडपड असते. पोलीस दीदी उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांना चांगल्या - वाईट स्पर्शाची जाणीव करून देतात.
परिमंडळ - ३
पोलीस उपायुक्त - अखिलेश सिंग,
येथे करा संपर्क : पंतनगर पोलीस ठाणे - २५०१३६२४, २१०२८९१४
अफवांवर विश्वास
ठेवू नका..
नागरिकांनी नेहमी सतर्क राहावे. अफवांवर विश्वास ठेवू नका. एकोप्याने राहा. नैतिक मूल्य जपा.
- रोहिणी काळे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक