आणि शिवसेना सचिवांनी उर्मिला मातोंडकरांची केली होती आस्थेने चौकशी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 10:47 PM2020-10-31T22:47:34+5:302020-10-31T22:47:34+5:30
Urmila Matondkar : कंगना विरोधात त्यांनी ट्विट करून महाआघाडी सरकारची बाजू घेत आक्रमक भूमिका घेतली होती.
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई:2019च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला मातोंडकरांचा पराभव केला होता.काँगेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडणुकीत काम केली नसल्याची तक्रार त्यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा यांच्याकडे केली होती.मात्र त्यांच्यावर पक्षाने कारवाई तर केलीच नाही,उलट त्यांना पदे दिली.त्यामुळे त्या काँगेस पक्षावर नाराज होत्या. उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून सप्टेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजिनामा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दिला होता.
त्यानंतर आठ दिवसांनी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी त्यांची फोनवर आस्थेने चौकशी केली होती. यासंदर्भात लोकमत ऑनलाईन आणि लोकमतच्या अंकात दि,16 व दि,17 सप्टेंबर 2019 रोजीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात लोकमतच्या बातमीची जोरदार चर्चा झाली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोटुंबिक संबंध असल्याने तुम्ही कश्या आहात अशी आस्थेने चौकशी केली होती. यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते असा खुलासा नार्वेकरांनी त्यावेळी लोकमतला सांगितले होते.
उर्मिला मातोंडकरांना काँग्रेस पक्ष मोठी जबाबदारी देणार अशी पूर्वी चर्चा होती,पण तसे काही घडले नाही. दस्तुरखुद्द मातोंडकर या महाबळेश्वरला असतांना त्यांनी तेथून अलिकडेच मुख्यमंत्री निधीला देखिल मदत केल्याचे समजते.
कंगना विरोधात त्यांनी ट्विट करून महाआघाडी सरकारची बाजू घेत आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेना सचिवांची दूरदृष्टी व मातोंडकर यांचे मतोश्रीशी असलेले कोटुंबिक संबंध लक्षात घेता आता राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार का? याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असून याचे उत्तर येत्या सोमवारी मिळण्याची शक्यता आहे.