मुंबई : मोबाईल कंपन्यांच्या ऑफर्स, पोर्टेबिलिटीसाठी प्रस्ताव, कर्जासाठीचे फोन यांनी आपण कावलेले असतो. डीएनडीमध्ये आपला फोन नंबर असला तरी त्यावर हे लोक काहीतरी मार्ग काढतात. फोन करून वैताग आणतात. असा ताप दिला वोडाफोन कंपनीने कवी आणि व्याख्याते प्रसाद कुलकर्णी यांना. त्यांनी ते प्रकरण तडीस नेले आणि अखेर वोडाफोनला नमते घ्यावे लागले.
प्रसाद कुलकर्णी यांना वोडाफोन कंपनीने आठ तासांत सलग तीस वेळा कॉल करून त्रास दिला. वोडाफोन-आयडियाच्या नेटवर्कमधील ढिलाई तसेच वारंवार कॉल ड्रॉप याला वैतागून कुलकर्णी यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी वोडाफोनला कळवले. १६ तारखेला प्रसाद कुलकर्णी यांना याबद्दल विचारणा करणारे तब्बल ३० कॉल एकाच दिवसात आले.
सकाळी ९.३७ मिनिटांनी पहिला कॉल आला. या कॉलला कुलकर्णी यांनी उत्तर दिले. उत्तर दिल्यानंतरही त्यांना लगेच दुसरा कॉल आला. यालाही त्यांनी प्रतिसाद दिला. नेटवर्क बदलण्याचे कारण सांगितले. तरीही एकामागून एक कॉल कुलकर्णी यांना येतच राहिले. महत्त्वाच्या बैठका सुरू असतानाही हे कॉल सुरू होते. आठ तासांच्या कालावधीत कुलकर्णी यांना ३० वेळा फोन आले.
या त्रासाला कंटाळून कुलकर्णी यांनी कॉल रेकॉर्डच्या स्क्रीनशॉटच्या पुराव्यासह रीतसर तक्रार ग्राहक कक्षाकडे नोंदवली. तसेच या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची मागणीदेखील केली होती. मात्र, झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी दूरच, त्यांनी तक्रार निवारण झाले आहे असा मेसेज त्यांना आला. हा सगळा प्रकार कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर सविस्तर टाकला तसेच जर कंपनीने कोणत्याही प्रकारची कृती केली नाही, तर मात्र ट्रायकडे जाण्याची तयारी ठेवली होती. त्यावर मनसेचे गोरेगाव विभागाचे अध्यक्ष वीरेंद्र जाधव तसेच शैलेंद्र मोरे यांनी कंपनीमध्ये जाऊन विचारणा केली. त्यानंतर वोडाफोनकडून झालेल्या प्रकाराबद्दल कुलकर्णी यांची लेखी माफी मागण्यात आली.