...आणि ती भेट अखेरची ठरली!
By admin | Published: June 27, 2017 02:21 AM2017-06-27T02:21:42+5:302017-06-27T02:21:42+5:30
‘हत्येच्या गुन्ह्यात ती अडकली. १४ वर्षांचा कारावास संपवून ती घरी येणार होती. मे महिन्याच्या अखेरीस तिची भेट झाली. तिच्याशी गप्पा मारल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘हत्येच्या गुन्ह्यात ती अडकली. १४ वर्षांचा कारावास संपवून ती घरी येणार होती. मे महिन्याच्या अखेरीस तिची भेट झाली. तिच्याशी गप्पा मारल्या. तेव्हाही आम्ही तिच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले. मात्र, ती भेट अखेरची ठरेल, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते...’ असे भायखळा कारागहात मृत्यू झालेल्या मंजुळा शेट्ट्येचा भाऊ अनंत शेट्ट्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भांडुपच्या बडवाईक परिसरात मंजुळा चार भावांसोबत राहायची. १९९६ मध्ये मोठ्या भावजयने जाळून घेतले. यामध्ये भावाच्याच दबावापोटी भावजयने मंजुळासह आईमुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. उपचारादरम्यान भावजयचा मृत्यू झाला. याच हत्येच्या गुन्ह्यात दोघींनाही अटक झाली. त्यांना दोषी ठरवित, १४ वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. अटकेनंतर ती येरवडा कारागृहात होती. सहा महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले. ती सर्वांच्याच जवळची होती. तिच्या चांगल्या वागणुकीमुळे येरवडा कारागृहात आम्हालाही मान मिळत असल्याची माहिती अनंत शेट्ट्ये यांनी दिली.
त्यानंतर, भायखळा कारागृहात तिची रवानगी करण्यात आली होती. प्रत्येक महिन्याला तिला भेट देणे आमचे ठरलेले होते. मे महिन्यात आम्ही तिला भेटलो. तेव्हाही तिचे डोळे सुजलेले होते. खूप काम असते. येथे खूप त्रास असल्याचे मंजुळाने सांगितले होते. मात्र, तिला समजावून लवकरच तू घरी येणार आहेस, सारे काही व्यवस्थित होईल, अशी आशा तिच्या मनात रुजवून आम्ही निघालो. २४ जून रोजी आम्ही तिला भेटायला यायचे ठरविले. त्यापूर्वीच सकाळी तिच्या मृत्यूची बातमी कानावर पडल्याने धक्काच बसला. मे महिन्यातील ती भेट अखेरची ठरली, असे सांगताना अनंत शेट्ट्ये यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करत आम्हाला न्याय द्या, असे शेट्ट्येंचे म्हणणे आहे, तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना दुसऱ्या कारागृहात शिफ्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यामधील साक्षीदारांवर दबाब आणून ते मागे फिरतील, अशी भीती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली.