मेट्रोच्या कामादरम्यान रस्त्यात पडला २४ फुटांचा खड्डा; MMRDA ने स्थानिकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 06:38 PM2024-08-24T18:38:17+5:302024-08-24T18:49:35+5:30
अंधेरीत मेट्रोच्या कामावेळी रस्त्यात २४ फुटांचा खड्डा पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय
Mumbai Metro : मुंबईच्याअंधेरी परिसरात रात्री मोठा अपघात घडला. शुक्रवारी रात्री उशिरा अंधेरी पूर्व येथील पी अँड टी कॉलनीतील रस्त्यावर मोठा खड्डा तयार झाला. सहार रोडवर चालणाऱ्या मेट्रोच्या बोगद्याच्या कामादरम्यान रस्त्याचा काही भाग खचल्याची माहिती नागरिकांनी दिली. तब्बल २४ फूट खोल खड्डा भररस्त्यात तयार झाला. त्यामुळे आसपासच्या इमारतींना मोठा धोका निर्माण झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून उपाययोजना सुरु केल्या.
मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अंधेरी पूर्वच्या गुंदवलीपासून सहार विमानतळापर्यंत मेट्रो ७ ए मार्गाचा विस्तार सुरु आहे. मात्र या मार्गावर टनेलिंगचे काम सुरु असताना अंधेरी पूर्व येथील सहार पीएनटी कॉलनीत भलामोठा खड्डा पडला. या खड्ड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. लहान मुले आणि महिला उभ्या असतानाच हा खड्डा पडल्याने घबराट पसरली. मात्र सुदैवाने या कोणतीही दुर्घटना घडली नाही. साधारणपणे आठ मीटर खोल आणि तीन मीटर व्यासाचा खड्डा पडल्यामुळे तिथल्या नागरिकांना मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून हॉटेलमध्ये हलवण्यात आलं आहे.
रात्री १० च्या सुमारास खड्डा पडण्यास सुरुवात झाली. हळूहळू खड्डा वाढत गेला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मोठ्या खड्ड्यामुळे एकूण नऊ कुटुंबे बाधित झाली असून अधिकाऱ्यांनी या कुटुंबांना जवळच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने शनिवारी दुपारी हा खड्डा भरला.
मेट्रो ७ एसाठी बोगद्याच्या कामामुळे २४ फूट खोल खड्डा निर्माण झाला, ज्यामुळे जवळपासच्या निवासी इमारतींना मोठा धोका निर्माण झाला. नजीकच्या पीटी कॉलनीतील एकूण नऊ बाधित कुटुंबांना खबरदारी म्हणून जवळच्या हॉटेल औरिका येथे हलवण्यात आले. एमएमआरडीए आणि एमएमआरसीएलकडे तात्काळ कारवाई करण्याची आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, जे. कुमार कॉन्ट्रॅक्टर यांनी सुमारे २० ट्रक रिइन्फोर्स सिमेंट काँक्रीट टाकून हा खड्डा भरण्यात आला आहे.