लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना राज्यात रक्ताची टंचाई भासू शकते, अशी भीती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे अंधेरीतील शिवसैनिकांनी महारक्तदान शिबिराचे आयोजन करत ५४२ बाटल्या रक्ताचे संकलन केले.
अंधेरी (पूर्व) मरोळ येथील युवा सेनेचे उपविभाग अधिकारी रितेश राय आणि महाराष्ट शिवसेना संघटक व माजी नगरसेवक कमलेश राय यांनी आयोजित केलेल्या या महारक्तदान शिबिरामध्ये सुमारे ५४२ दात्यांनी रक्तदान केले. या ५४२ जणांच्या रक्ताचे संकलन बाळासाहेब ठाकरे ब्लड बॅंक यांच्याकडे केल्याची माहिती कमलेश राय यांनी दिली.
अंधेरी पूर्वेकडील मरोळ नाका येथील सनावीला बॅंक्वेट हाॅलमध्ये आयोजित केलेल्या या महारक्तदान शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अंधेरीत प्रथमच ५४२ दात्यांनी रक्तदान केल्याची माहिती माजी नगरसेवक कमलेश राय यांनी दिली. या रक्तदान शिबिराचे आयोजन करणारे युवा सेना उपविभाग अधिकारी रितेश राय यांचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी विशेष कौतुक केले.
या शिबिरावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गजानन कीर्तीकर, प्रभाग क्रमांक ८६ च्या नगरसेविका सुषमा कमलेश राय, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, शाखाप्रमुख बिपीन शिंदे, महिला शाखा संघटक सरिता रेवाळे, युवा शाखा अधिकारी किरण पुजारी, मनोहर पांचाळ यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------