अंधेरी दुर्घटनेतील जखमी प्रवासी व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:07 AM2018-07-07T05:07:43+5:302018-07-07T05:07:58+5:30

अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नसून त्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

In the Andheri accident, the injured traveler, the ventilator, is worried | अंधेरी दुर्घटनेतील जखमी प्रवासी व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

अंधेरी दुर्घटनेतील जखमी प्रवासी व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

googlenewsNext

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नसून त्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. दरम्यान काटकर यांच्यावर अँटी गँगरिनच्या इंजेक्शनचा परिणाम न झाल्यास त्यांच्या डाव्या हातावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला होता. मात्र त्या व्हेंटिलेटरवर असल्याने ही शस्त्रक्रिया होऊ शकली नाही.
काटकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या जिवाला धोका असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर याआधीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे आता त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या गिरधारी सिंग आणि द्वारकाप्रसाद शर्मा यांच्यावरही कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांच्याही हाताला दुखापत झाली असून दोघांच्यही हातात सळई घालण्यात आली आहे. तर मनोज मेहता यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
३ जुलै रोजी सकाळी पश्चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्टेशनजवळील गोखले पुलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत पाच प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी अस्मिता काटकर या पुलाच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले असली तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे.

दुर्घटनेच्या दिवशी नेमके काय घडले?
नेहमीप्रमाणे अस्मिता काटकर यांनी आपल्या ६ वर्षीय मुलाला अंधेरी पूर्वेकडील परांजपे विद्यालयात सोडले व कामासाठी गोखले पुलावरून जुहूच्या दिशेने त्या पायी प्रवास करू लागल्या.
काही समजण्याच्या आतच गोखले पुलाचा काही भाग कोसळला आणि ढिगाºयाखाली त्या अडकल्या. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून अस्मिता काटकर यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
ढिगाºयाखाली अडकल्याने अस्मिता काटकर गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यांचे संपूर्ण शरीर सुजले होते. त्यांच्या डोक्यालादेखील गंभीर दुखापत झाल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले होते. अखेर साडीच्या आधारावर अस्मिता यांची ओळख पटली.

Web Title: In the Andheri accident, the injured traveler, the ventilator, is worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.