अंधेरी ते बोरिवली, मुलुंड सक्रिय रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 09:24 PM2020-10-03T21:24:34+5:302020-10-03T21:26:10+5:30
हॉट स्पॉट ठरलेल्या बोरिवली विभागात सक्रिय रुग्णांचे प्रमाण अडीच हजारांवर पोहोचले आहे.
मुंबई - गेल्या महिन्यापासून बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा १७ हजारांवरून २९ हजारांवर पोहोचला आहे. मात्र ही वाढ प्रामुख्याने जोगेश्वरी - अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि मुलुंड या सहा विभागांमध्ये सक्रिय रुग्ण अधिक आहेत. हॉट स्पॉट ठरलेल्या बोरिवली विभागात सक्रिय रुग्णांचे प्रमाण अडीच हजारांवर पोहोचले आहे.
मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी गेल्या महिन्यात ५५ दिवसांपर्यंत खाली घसरला होता. महापालिकेने १५ सप्टेंबरपासून सुरू केलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी ' मोहिमेनंतर यामध्ये सुधारणा दिसून येत आहे. सध्या ६४ दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होत असून दैनंदिन रुग्ण वाढ १.०९ टक्के एवढी आहे. परंतु, पश्चिम उपनगर उपनगरात विशेषता अंधेरी पूर्व आणि पश्चिम तसेच बोरवली विभागात मृतांची आणि सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
यामुळे अंधेरी, बोरिवली, मुलुंड ठरतात हॉट स्पॉट...
के पश्चिम म्हणजेच सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी विभागात विमानतळ आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, औद्योगिक वसाहतींचे प्रमाण या विभागात अधिक आहे. या विभागाची लोकसंख्या ही मुंबईत सर्वाधिक आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली येथे मीरा - भाईंदर, वसई आणि पूर्व उपनगरात मुलुंड येथे ठाणे परिसरतील बाधित रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या विभागांमध्ये रुग्णांची संख्या अधिक दिसून येते, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
सक्रिय रुग्ण अधिक असलेले विभाग...
विभाग..आतापर्यंत रुग्ण....सक्रिय रुग्ण
आर मध्य - बोरिवली...१३६२५...२४७३
के पश्चिम - अंधेरी प., विले पार्ले...१२७४८...२०४०
पी उत्तर - मालाड...१२४२५....१९९०
के पूर्व - जोगेश्वरी, अंधेरी पूर्व...१२२८८....१८५१
आर दक्षिण - कांदिवली....१११८२....१८९२
टी... मुलुंड....९४५३....१५४४
सर्वाधिक मृत्यू....
के पूर्व...जोगेश्वरी, अंधेरी पूर्व....६०१
जी उत्तर...धारावी, दादर, ५६०
एस....भांडुप.....५३७
एल...कुर्ला....४९१
एन....घाटकोपर....४७३
* बोरवली विभागात सर्वात कमी म्हणजेच ४६ दिवसांमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. त्यानंतर वांद्रे पश्चिम आणि ग्रँट रोड, मलबार हिल विभागात ४८ दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होत आहे.