मुंबई - अंधेरी-विलेपार्ले स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा भाग मंगळवारी (3 जुलै) सकाळी कोसळून दुर्घटना घडली. या घटनेत 5 जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. वाहतूक सेवा कोलमडल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, अंधेरी पूल दुर्घटनेवरुन रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. कोसळलेला गोखले पूल हा मुंबई महापालिके अंतर्गत येतो, असे रेल्वे प्रशासनानं पत्रकाद्वारे म्हटले आहे. तर दुसरीकडे गोखले पुलाच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहेत, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.
दरम्यान, महापौरांच्या विधानावर भाजपानं टीकास्त्र सोडले आहे. ''कोसळलेला पूल मुंबई महापालिकेनं बांधला आहे. त्याच्या देखभालींच कार्य मुंबई महापालिकेने करणे आवश्यक होते', असे म्हणत भाजपा खासदार किरीट सोमय्या महापौरावर निशाणा साधला आहे.