Andheri Bridge Collapse: ढिगाऱ्यात अडकलेल्या अस्मिताला तिचे कुटुंबीयही ओळखू शकले नाहीत !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 11:13 AM2018-07-04T11:13:39+5:302018-07-04T11:27:38+5:30

पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यानं संपूर्ण शरीर सुजले होते. यामुळे अस्मिता यांना ओळखणं त्यांच्या कुटुंबीयांना व शेजाऱ्यांना अशक्य झाले होते.

Andheri Bridge Collapse: Asmita katkar's family couldn't recognise her | Andheri Bridge Collapse: ढिगाऱ्यात अडकलेल्या अस्मिताला तिचे कुटुंबीयही ओळखू शकले नाहीत !

Andheri Bridge Collapse: ढिगाऱ्यात अडकलेल्या अस्मिताला तिचे कुटुंबीयही ओळखू शकले नाहीत !

Next

मुंबई - अंधेरी रेल्वे स्टेशनजवळील गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी (3 जुलै) सकाळी रेल्वेमार्गावर कोसळला. या दुर्घटनेत एका महिलेसह पाच प्रवासी गंभीर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमध्ये अस्मिता काटकर (वय 40 वर्ष) या इतक्या गंभीर जखमी झाल्या होत्या की, त्यांना ओळखणं कुटुंबीयांना अशक्य झाले होते.  पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यानं त्यांचे संपूर्ण शरीर सुजले होते. 

नेहमीप्रमाणे अस्मिता यांनी आपल्या 6 वर्षीय मुलाला अंधेरी पूर्वेकडील परांजपे विद्यालयात सोडले व आपल्या कामासाठी गोखले पुलावरुन जुहूच्या दिशेनं त्या पायी प्रवास करू लागल्या. काही समजण्याच्या आतच गोखले पुलाचा काही भाग कोसळला आणि  त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या गेल्या. यानंतर तातडीनं त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नव्हती. तर दुसरीकडे काटकर कुटुंबीयांनाही या दुर्घटनेबाबत काहीच माहिती नव्हती. जुहू येथे अस्मिता घरकामासाठी जातात.  

(Andheri Bridge Collapse : तब्बल 16 तासांनंतर पश्चिम रेल्वे पूर्ववत, मात्र दुरुस्तीसाठी गोखले पूल बंद )

वृत्तवाहिन्यांद्वारे त्यांना अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात पूल कोसळल्याची माहिती मिळाली. यावेळी जखमींमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचंही समजले. दुर्घटनास्थळ परिसरातूनच अस्मिता यांचा कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्याचा मार्ग असल्यानं त्यांचे पती लहू यांनी मालकीणीला फोन करुन पत्नी पोहोचली की नाही?, याची विचारपूस केली. 

यावेळी कामाच्या ठिकाणी अस्मिता पोहोचलेल्या नसल्याची माहिती मिळाली. यानंतर मात्र काटकर कुटुंबीयांची धाकधाकू वाढली. पत्नीच्या शोधासाठी त्यांनी स्थानिक आमदार आशिष सातव यांच्याकडे धाव घेतली. सातव यांच्या कार्यकर्त्यांसोबत हॉस्पिटल गाठून अस्मिता यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तिची ओळख पटवणं अशक्य होते, असे अस्मिता यांचे दीर अंकुश काटकर यांनी सांगितले.

ढिगाऱ्याखाली अडकल्यानं अस्मिता काटकर गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यांचे संपूर्ण शरीर सुजले होते. त्यांच्या डोक्यालादेखील गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. अखेर साडीच्या आधारावर अस्मिता यांची ओळख पटली आणि काटकर कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. 

  


 

Web Title: Andheri Bridge Collapse: Asmita katkar's family couldn't recognise her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.