मुंबई: बुलेट ट्रेनच्या गप्पा पुरे, आधी लोकल सेवा सुरक्षित करा, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं अंधेरीतील पूल दुर्घटनेवरुन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. 'रेल्वेमंत्री कधी पूल बांधण्यासाठी लष्कराला मुंबईत आणतात, तर कधी बुलेट ट्रेनच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. हे सर्व करण्याआधी त्यांनी मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित करावा,' असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.अंधेरीजवळचा पादचारी पूल आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी कोसळला. पुलाचा बराचसा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला. यावरुन काँग्रेसनं सरकारवर निशाणा साधला. 'बुलेट ट्रेनच्या गप्पा करण्याआधी मुंबईतील लोकल सेवा सुरक्षित करा. लोकल सेवा ही मुंबईकरांसाठी जीवन आहे. त्यामुळे मुंबईकरांचं जीवन सुरक्षित व्हायला हवं,' असं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलं. 'रेल्वे प्रशासनानं अशा घटनांमधून बोध घ्यावा आणि मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करण्यास प्राधान्य द्यावं,' असंही ते म्हणाले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. थोड्याच वेळात रेल्वेमंत्री नियोजित बैठकीसाठी मुंबईला येणार आहेत. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल, महापालिका आणि पोलिसांकडून मदतकार्य सुरू आहे. मुंबईकर कार्यालयात जाण्यासाठी निघाले असताना ही दुर्घटना घडली. त्यामुळे हजारो मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Andheri Bridge Collapse : बुलेट ट्रेनच्या घोषणा पुरे; आधी लोकल सेवा सुरक्षित करा- निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 11:13 AM