Join us

Andheri Bridge Collapse : हजारो प्रवाशांचा 'देवदूत' बनलेल्या चंद्रशेखर सावंत यांना ५ लाखांचे इनाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 6:18 PM

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली घोषणा 

मुंबई - आज सकाळी अंधेरी रेल्वे रुळावर पूल कोसळताना पाहून समयसूचका दाखवत मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी आपत्कालीन ब्रेक लावत लोकल थांबविली. त्यामुळे लोकलमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. अशा या देवदूत मोटरमनला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

 

आज सकाळी ७. १५ वाजता अंधेरी रेल्वे स्थानकातून चर्चगेटकडे जाणारी लोकल निघाली असताना सावंत यांना समोर पूल कोसळताना दिसले. जवळजवळ १०० मीटर अंतरावर हा पूल असून लोकलने वेग पकडला असताना मोटरमन सावंत यांनी प्रसंगावधान दाखवत आपत्कालीन ब्रेक (इमर्जन्सी ब्रेक) दाबला. त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. सकाळची वेळ असल्याने पश्चिम उपनगरातील चाकरमानी कार्यालयाकडे जाण्यासाठी निघतात. त्याप्रमाणे चर्चगेटकडे निघालेल्या या लोकलमध्ये देखील हजारो प्रवासी होते. या कोसळणाऱ्या पुलाखाली जर हि लोकल आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, या प्रवाशांचा देवदूत ठरलेल्या मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्यावर सर्व स्तरातून कौतुक होत असताना पियुष गोयल यांनी त्यांना ५ लाखांचे इनाम घोषित केले आहे. 

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटनापश्चिम रेल्वेमुंबईपीयुष गोयलअंधेरीपाऊसमान्सून 2018मुंबईचा पाऊसरेल्वे