Andheri Bridge Collapse : विमान चुकलेल्या प्रवाशांना पुढील प्रवासात सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:26 AM2018-07-04T00:26:50+5:302018-07-04T00:27:47+5:30
अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली.
मुंबई : अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली.पर्याय म्हणून नागरिकांनी रस्ते वाहतुकीकडे मोर्चा वळवला. रस्ते वाहतुकीला नेहमीपेक्षा जास्त विलंब होत असल्याने हवाई प्रवासासाठी विमानतळाकडे निघालेल्या अनेकांना विमानतळावर वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे हवाई वाहतुकीसाठी निघालेल्या अनेक प्रवाशांचे विमान चुकल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अशा प्रवाशांना काही खासगी विमान कंपन्यांनी दिलासा दिला. प्रवाशांचे नुकसान होऊ नये यासाठी काही विमान कंपन्यांनी या प्रवाशांना पुढील विमानातील उपलब्ध आसनांप्रमाणे आसन दिले. यासाठी कोणताही अतिरिक्त दर आकारला नाही.
अनेक शाळा बंद
पुलाचा भाग कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यातच पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला. अनेक शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत वेळेवर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे मुंबईतील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या तर काही एक ते दीड तासांचत सोडून देण्यात आल्या.