Join us

Andheri Bridge Collapse : ...तर मोठा अनर्थ घडला असता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 12:10 PM

'या' कारणांमुळे मोठी जीवितहानी टळली

मुंबई: अंधेरीजवळील पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. या दुर्घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. सध्या एनडीआरएफ, अग्निशमन दल, पालिका यांच्याकडून मदतकार्य सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास पाच ते सहा तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. अंधेरीजवळ असलेला पादचारी पूल सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी कोसळला. या पुलाजवळच रेल्वेचे फलाट आणि दोन शाळा आहेत. मात्र सुदैवानं दुर्घटनेवेळी पुलावर फार पादचारी नव्हते. आठनंतर या भागात मोठी गर्दी होते. मात्र त्याआधी हा पूल कोसळल्यानं मोठी जीवितहानी टळली. गर्दीच्या वेळी जर हा पूल कोसळला असता, तर अतिशय भीषण परिस्थिती उद्भवली असती. हा पूल आधी कोसळला असता, तरीही मोठा दुर्देवी प्रसंग घडला असता. कारण या भागातील शाळकरी मुलं याच पुलाचा वापर करतात. सकाळी मुलं शाळेत गेल्यावर हा पूल कोसळला. त्यामुळे सुदैवानं जीवितहानी झाली नाही. अंधेरीच्या 8 आणि 9 फलाटांवर पादचारी पूल कोसळला. या फलाटांवर लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबतात. त्यामुळे या फलाटांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र ज्यावेळी पुलाचा काही भाग कोसळला, त्यावेळी फलाटावर लांब पल्ल्याची गाडी नव्हती. गाडी नसल्यानं फलाटावरही प्रवाशांची फारशी वर्दळ नव्हती. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेमुळे फलाटाचं छत कोसळलं आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटनापश्चिम रेल्वेमुंबई