Andheri Bridge Collapse : अंधेरी पूल दुर्घटनेमुळे नोकरदारांना घडणार 'उपवास'; डबेवाल्यांची सेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 09:17 AM2018-07-03T09:17:30+5:302018-07-03T10:58:41+5:30
अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
मुंबई - अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळेस वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे सकाळी-सकाळीच रेल्वे वाहतूक कोलमडल्यामुळे हैराण झालेल्या चाकरमान्यांना या घटनेमुळे उपाशीदेखील रहावे लागण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईकरांना दररोज न चुकता वेळेवर डबा पोहोचवणारे 'मॅनेजमेंट गुरू' मुंबईचे डबेवालेदेखील अंधेरी ते विरारदरम्यान अडकून पडले आहेत. अंधेरी पूल दुर्घटनमुळे डबेवाल्यांची सेवा खंडीत झाली आहे. यामुळे डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्यात आल्यानं चाकरमान्यांची आज दुपारच्या जेवणाच्या बाबतीत पंचाईत होणार आहे.
वर्षाचे सर्व कामांचे नियोजन करुन मुंबईकरांना डबे पोहोचवण्याच्या सेवेत कधीही खंड पडू, यासाठी मुंबईचे डबेवाले प्रयत्न करत असतात. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे जगभरात कौतुक होत आहे.
(Andheri Bridge Collapse: काय आहेत प्रवासाचे पर्यायी मार्ग)
पूल दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यानचा गोखले पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनिश्चित काळासाठी पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्यानं त्याचा मनस्ताप ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतोय.
सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला. या पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. याचा फटका हार्बर रेल्वेलादेखील बसला आहे. पूल कोसळल्यानं दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुलाचा कोसळलेला भाग बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जोरदार पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत.
Crowd management machinery has been strengthened on Central Railway at all major stations from Ghatkopar onwards. Harbour line passengers have been allowed to travel freely on Central Railway: Central railway.
— ANI (@ANI) July 3, 2018