नवी दिल्ली- अंधेरी-विलेपार्लेदरम्यान सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पूल कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे सुरक्षा आयोगामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. अंधेरीजवळ पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.अधिका-यांना इतर विभागांशी संपर्क ठेवून ढिगारा बाजूला करून स्थिती पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिका-यांची बैठक बोलावली होती.
अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यानचा गोखले पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनिश्चित काळासाठी पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्यानं त्याचा मनस्ताप ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतोय.सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला. या पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. याचा फटका हार्बर रेल्वेलादेखील बसला आहे. पूल कोसळल्यानं दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुलाचा कोसळलेला भाग बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जोरदार पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत.