Andheri Bridge Collapse: अंधेरी पूल दुर्घटनेच्या बातमीनं ठाणेकरांचा ठोका चुकला, 'तो' अपघात आठवला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 02:28 PM2018-07-03T14:28:38+5:302018-07-03T14:30:50+5:30
अंधेरीतील पूल दुर्घटनेनं पश्चिम रेल्वेवरील प्रवासी हा हादरलेतच, पण मध्य रेल्वेवरील ठाण्यापुढच्या प्रवाशांना एक जुनी दुर्घटना आठवली आहे.
मुंबईः अंधेरी रेल्वे स्टेशनजवळच्या गोखले पुलाचा भाग कोसळल्याची बातमी सकाळीच धडकली आणि मुंबईकरांच्या काळजात क्षणभर धस्स झालं. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्यानं सगळ्यांनीच निःश्वास सोडला, पण लाइफलाइन ठप्प झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पश्चिम रेल्वेवरील प्रवासी हा अपघातानं हादरलेच, पण मध्य रेल्वेवरील ठाण्यापुढच्या प्रवाशांना एक जुनी दुर्घटना आठवली आणि त्यांच्याही हृदयाचा ठोका चुकला.
२२ ऑक्टोबर २००९ रोजी ठाण्याजवळ कोपरी येथील रेल्वे उड्डाण पुलाचा गर्डर कुजलेल्या लाकडावरून सटकून जुन्या पाइप लाइन पुलावर आदळला होता आणि रेल्वेवर कोसळला होता. या दुर्घटनेत मोटरमनसह दोघांचा मृत्यू झाला होता आणि ११ प्रवासी जखमी झाले होते. मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी साडेदहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत बंद होती आणि त्यामुळे हजारो प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले होते. रेल्वे आणि ठाणे महापालिका प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कोपरीतील रेल्वे उड्डाणपुलाचं काम रखडलं होतं. गर्डर टाकण्याचं काम अर्धवटच झालं होतं. या गर्डरला आधार देणारं लाकूड कुजल्यानं तो गर्डर बाजूच्याच जलवाहिनी पुलावर कोसळला होता. त्याचवेळी मुंबईहून डोंबिवलीला जाणारी धिमी लोकल पुलाखाली आली होती. आज या घटनेला साडेआठ वर्षं झाली आहेत, पण मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन आजही तितकंच निष्काळजी असल्याचं अंधेरी पूल दुर्घटनेनं दाखवून दिलं आहे.
अंधेरीत कोसळलेल्या गोखले पुलाची जबाबदारी घ्यायला रेल्वे प्रशासन तयार नाही आणि महापालिकेनंही हात वर केले आहेत. मुंबई पालिकेचा पुलाशी काहीच संबंध नाही, त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेचीच होती, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटलंय, तर रेल्वेनं महापालिकेकडे बोट दाखवलंय. पण, या दोघांच्या भांडणात मुंबईकरांचे हाल होताना दिसताहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एल्फिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली होती. निष्पाप मुंबईकरांना त्यात जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर सगळेच खडबडून जागे झाले होते. पण, रेल्वे स्टेशनांवरील आणि रेल्वे मार्गांवरील किती पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं, त्यातून काय निष्पन्न झालं, त्यावर काय कार्यवाही झाली, हे प्रश्न अंधेरी पूल दुर्घटनेनं अधिकच गहन झालेत.