मुंबई - अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला जाग आली असून, मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असलेल्या पुलांचे शुक्रवारपासून स्ट्रक्चरल ऑडिड करण्यात येणार आहे. आज मनपा आयुक्त आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून 12 पथके रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहेत.
उच्च न्यायालयाने कान टाेचल्यानंतर आपल्या जबाबदारीची जाणीव झालेल्या महापालिका व रेल्वे अखेर मुंबईतील पूल सुरक्षित करण्यासाठी पावलं उचलली आहेत. महापालिका व मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांच्या गुरूवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत ४४५ पुलांच्या संरचनात्मक तपासणीचा निर्णय घेण्यात आला. ही तपासणी उद्यापासून सुरू हाेत असून यासाठी १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवारी अंधेरी येथील रेल्वे मार्गावरून जाणारा पादचारी पूल काेसळला. या दुर्घटनेत पाचजण जखमी झाले. तरीही या पुलाची जबाबदारी घेण्यावरून महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनामध्ये टाेलवाटाेलवी सुरू हाेती. दरम्यान, मंगळवारी रात्री ग्रँटराेड येथील पुलालाही तडे गेल्याचे समाेर आले. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी फटकारल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. केंद्रीय रेल्वे मथ्री पियुष गाेयल यांनीही दुर्घटनेच्या पाहणीनंतर मुंबईतील पुलांच्या संरचनात्मक तपासणीचे आदेश दिले हाेते. त्यानुसार आता वेगाने कार्यवाही हाेणार आहे.
पालिका आयुक्त अजाोय मेहता यांनी आज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांबराेबर तातडीची बैठक बाेलाविली हाेती. या बैठकीत महापालिका, मध्य व पश्चिम रेल्वे यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. तसेच यापुढे दर महिन्याला ठराविक दिवशी नियमितपणे बैठक घेण्याचा निर्णय झाला. या बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अभियंता व संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता उपस्थित राहतील आणि महापालिका व रेल्वेच्या यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयन साधण्याचे काम करतील, असे ठरले.
या वरिष्ठ अधिका-यांची उपस्थिती
महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अभियंता उपस्थित होते. तसेच महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे संचालक विनोद चिठोरे, पूल खात्याचे प्रमुख अभियंता शीतलाप्रसाद कोरी हे देखील उपस्थित होते.
तज्ज्ञांमार्फत पुलांची पाहणी
मुंबईत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये आरओबी(रेल्वे मार्गावरील पूल) एफओबी(पादचारी पूल), स्काय-वॉक इत्यादी प्रकारचे ४४५ पूल आहेत. या पुलांची संरचनात्मक तपासणी उद्यापासून सुरु करण्यात येत आहे. यासाठी एकूण १२ पथक गठीत करण्यात आले आहेत. या पथकात भारतीय प्रोद्योगिकी संस्थान (आय आय टी, मुंबई) येथील तज्ज्ञ, संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता व महापालिकेच्याही तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश असणार आहे.
या पुलांची प्राधान्याने तपासणी
पुलांची संरचनात्मक तपासणी करताना जे पूल सर्वात जुने आहेत, त्यांच्या संरचनात्मक तपासणीला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. उदा: लोकमान्य टिळक पूल, एलफिन्स्टन पूल इत्यादी.
हद्दीचा वाद मिटणार
महापालिका आणि रेल्वे यांच्या समन्यवयाचा अभाव असल्याचे अनेकवेळा समाेर आले आहे. पावसाळ्यापूर्वी रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईवरून पालिका आणि रेल्वेत नेहमीच वाद हाेत असताे. पूल असाे व रेल्वे मार्गातील कल्व्हर्टची सफाई महापालिका नियमित रेल्वे प्रशासनाला निधी देत असते. मात्र या कामांचा हिशाेब रेल्वेकडून देण्यात येत नसल्याचा आराेप पालिका अधिकारी करीत असतात. रेल्वे त्यांच्या हद्दीत प्रवेश देत नाही, असाही आराेप हाेताे. मात्र आज झालेल्या संयुक्त बैठकीत हद्दीचा हा वाद मिटल्याची चिन्हे आहेत. त्यानुसार यापुढे प्रत्येक महिन्यात एकवेळा महापालिका व रेल्वे अभियंत्यांची संयुक्त बैठक हाेणार आहे.
अशी हाेणार पुलांची दुरूस्ती
महापालिकेच्या अखत्यारितील 274 पुलांची संरचनात्मक तपासणी दाेन वर्षांपासून सुरू हाेती. याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच तातडीने दुरूस्ती आवश्यक असलेल्या पुलांची यादी तयार हाेणार आहे. त्यानुसार चांगल्या स्थितीतील पूल, किरकाेळ दुरूस्ती आणि माेठी दुरूस्ती, पुर्नबांधणी अशी पुलांची वर्गवारी करण्यात येणार आहे. पुढील काही वर्षांत तातडीने दुरूस्तीची गरद नसलेले पूल म्हणजे चांगले पूल, किरकाेळ दुरूस्ती म्हणजे पुलांवरील गळती राेखणे अशी छाेटी कामं तर पुलाला धाेका निर्माण करणा-या दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. मात्र धाेकादायक व पडण्याच्या स्थितीत असलेल्या पुलांची दुरूस्ती तात्काळ हाेणार आहेत, असे पालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता शितलाप्रसाद काेरी यांनी सांगितले.