Join us  

भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार; रवींद्र वायकरांनी समजावलं मतांचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 3:54 PM

एखाद्या व्यक्तीच्या घरातील कुणाचं निधन झालं असेल तर सहानुभूती मिळणार की नाही? हे ज्यांना कळत नसेल अक्कल नसेल तर काही बोलण्यात अर्थ नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. 

मुंबई - अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय होणार असून समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल. अंधेरी एकेकाळी हा काँग्रेसचा गड होता. आधी रमेश दुबे, सुरेश शेट्टी होते. रमेश लटके २ टर्म आमदार झाले. ३१ टक्के मते शिवसेनेची, २८ टक्के काँग्रेस आणि २५ टक्के मते भाजपाची आहेत. बाकीचे मनसे इतर पक्षांची आहेत. ६५ टक्के मते एकाबाजूला जाणार आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला. 

रवींद्र वायकर म्हणाले की, अंधेरी सर्वभाषिक मतदारसंघ आहे. त्यामुळे काँग्रेसचं इथे प्राबल्य होते. ३ टर्म ते निवडून आले. त्यानंतर सिताराम दळवी निवडून आले. त्यानंतर सुरेश शेट्टी विजयी झाले. त्यानंतर रमेश लटके दोनदा निवडून आले. याठिकाणी ६५ टक्क्यांहून अधिक मतदान ऋतुजा लटकेंना होणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरातील कुणाचं निधन झालं असेल तर सहानुभूती मिळणार की नाही? हे ज्यांना कळत नसेल अक्कल नसेल तर काही बोलण्यात अर्थ नाही असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच ऋतुजा लटकेंना ज्यारितीने अडचणी निर्माण करायचा होत्या त्या भाजपाने केल्या. बीएमसी कायद्यानुसार १ महिन्याचा पगार भरल्यानंतर तातडीने राजीनामा दिला तरी चालतो. त्यामुळे तुम्ही किती रडीचा डाव खेळतायेत हे जनतेला दिसतंय असा आरोप रवींद्र वायकर यांनी भाजपावर केला.  

सहानुभूती मिळवण्याचं षडयंत्रतर अंधेरी पूर्व मतदारसंघात प्रत्येक महिला मुरजी पटेल यांना काका म्हणते. प्रत्येक नागरीक काकांना भेटतोय. ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना अशी आहे. सहानुभूतीच्या जोरावर निवडणूक लढवली जात आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा न स्वीकारण्यामागे ठाकरे गटाचं षडयंत्र होतं. या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला. 

अंधेरी पूर्व मतदारसंघात विजयी होणार - मुरजी पटेल भाजपा घाणेरडे राजकारण करत नाही. पुढेही करणार नाही. ऋतुजा लटकेंचा राजीनामा ही तांत्रिक बाब होती. त्याचा भाजपाशी संबंध नव्हता. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय म्हणून मी प्रतिनिधित्व करणार आहे. विरोधकांचे आव्हान वाटत नाही. अपक्ष म्हणून मी ४८ हजार मते मी घेतली. आता तर भाजपासह युती पाठिंबा आहे. त्यामुळे ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ. वेळोवेळी कोण मदत करतं हे अंधेरीतील जनतेला माहिती आहे. जनता विकासाला साथ देईल. गोरगरीब जनतेसाठी कोणी काम केले हे लोकांना माहिती आहे. अंधेरीच्या भविष्याची ही निवडणूक आहे. ६ तारखेला मुरजी पटेल आणि भाजपा काय आहे हे विरोधकांना कळेल असं सांगत मुरजी पटेल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.  

टॅग्स :रवींद्र वायकरशिवसेनाभाजपा