Join us

रमेश लटके जिवंत असते तर...; भाजपा आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 12:22 PM

प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारे मुरजी पटेल आमदार म्हणून पुढे येतील त्याचा उत्साह विभागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं.

मुंबई - रमेश लटके यांचा मातोश्रीत कितीदा अपमान झाला हे मला माहिती आहे. उद्धव ठाकरे हे त्यांचा फोनही घेत नव्हते. माणूस जिवंत असताना त्याला किंमत दिली नाही. मृत्यूनंतर घाणेरड्या राजकारणासाठी वापर करून घेतला जात आहे. आज लटके जिवंत असले तर ते एकनाथ शिंदेंसोबत गेले असते असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. 

आमदार नितेश राणे म्हणाले की, सहानुभूतीची भाषा करणारे जे आहेत. त्यांनी वांद्रे विधानसभेत दिवंगत बाळा सावंतांच्या पत्नी तृप्ती सावंत यांचे फोनही घेणे बंद केले होते. भेटायचे बंद झाले. निवडणुकीपुरता त्यांचा वापर करण्यात आला. ऋतुजा लटकेंबाबतही असेच होणार आहे. मातोश्रीत कोणाला किती इज्जत मिळते हे सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी म्याव म्याव केली तर त्यासाठी प्रत्येक औषध माझ्याकडे आहे असा इशारा त्यांनी दिला. 

त्याचसोबत मुरजी पटेल अंधेरीच्या प्रत्येक मतदारसंघात कुटुंबांमध्ये परिचित आहे. काका म्हणून त्यांना ओळखतात. प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारे मुरजी पटेल आमदार म्हणून पुढे येतील त्याचा उत्साह विभागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो असं सांगत मुरजी पटेल यांचाच विजय होईल असा विश्वासही नितेश राणेंनी व्यक्त केला. 

अंधेरीत इतिहास घडणारविकासाचं राजकारण घेऊन आम्ही पुढे जात आहोत. अंधेरीतील युवांना रोजगार देऊ. सर्वात जास्त जीएसटी कर अंधेरीतून जातो. मतदारसंघाचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही. रस्त्यांवर वाहतूक कोंडीने लोक त्रस्त आहे. अंधेरी जनता सूज्ञ असून विकासाला मतदान देणारी आहे. प्रत्येक घरात माझा संपर्क आहे. त्यामुळे अंधेरीत इतिहास घडणार हे नक्की असा विश्वास भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांनी व्यक्त केला आहे. 

विरोधकांचे आव्हान वाटत नाहीभाजपा घाणेरडे राजकारण करत नाही. पुढेही करणार नाही. ऋतुजा लटकेंचा राजीनामा ही तांत्रिक बाब होती. त्याचा भाजपाशी संबंध नाही. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय म्हणून मी प्रतिनिधित्व करणार आहे. विरोधकांचे आव्हान वाटत नाही. अपक्ष म्हणून मी ४८ हजार मते मी घेतली. आता तर भाजपासह युती पाठिंबा आहे. त्यामुळे ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ. वेळोवेळी कोण मदत करतं हे अंधेरीतील जनतेला माहिती आहे. जनता विकासाला साथ देईल. गोरगरीब जनतेसाठी कोणी काम केले हे लोकांना माहिती आहे. अंधेरीच्या भविष्याची ही निवडणूक आहे. ६ तारखेला मुरजी पटेल आणि भाजपा काय आहे हे विरोधकांना कळेल असंही मुरजी पटेल यांनी म्हटलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :नीतेश राणे उद्धव ठाकरेशिवसेना