अंधेरी पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:13 AM2022-10-11T06:13:30+5:302022-10-11T06:14:13+5:30
अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदार संघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून, आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार असून, ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली असून, भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती दिली. ३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
१४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, १५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख तसेच ३ नोव्हेंबरला मतदान, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मतदारांची ओळख पटावी म्हणून नेमकी कोणती ओळखपत्रे लागतील, त्याची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.