Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात? ठाकरेंसमोर नवा पेच..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 08:30 AM2022-10-12T08:30:54+5:302022-10-12T08:31:29+5:30
अंधेरी पूर्व मतदार संघातील एका जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदार संघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून, आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार असून, ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पण आता अंधेरी पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे.
रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी आपल्या पालिकेतील नोकरीचा महिन्याभरापूर्वीच राजीनामा दिला आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेकडून अद्यापही तो मंजूर झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक असल्यानं ठाकरे गटाची पालिकेत धावाधाव सुरू झाली आहे. ऋतुजा लटके या महापालिका परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. दरम्यान, त्यांचा राजीनामा तात्काळ मंजूर व्हावा यासाठी अनिल परब यांनीदेखील पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्यापही त्यांचा राजीनामा मंजूर झाला नसल्यानं ठाकरे गटापुढील चिंता वाढली आहे.
कसा आहे निवडणुकीचा कार्यक्रम?
१४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, १५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख तसेच ३ नोव्हेंबरला मतदान, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मतदारांची ओळख पटावी म्हणून नेमकी कोणती ओळखपत्रे लागतील, त्याची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.