ऋतुजा लटके आयुक्तांना भेटल्या, पण राजीनामा मंजूर होईना, रिकाम्या हातीच परतल्या; ठाकरे गट गॅसवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 03:41 PM2022-10-12T15:41:53+5:302022-10-12T15:42:26+5:30
andheri by election rutuja latke: दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण तो अद्याप मंजूर झालेला नाही.
मुंबई
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना ठाकरे गटाच्या म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना अर्ज दाखल करण्यात अडचण निर्माण झाली आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण तो अद्याप मंजूर झालेला नाही. यामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून आपण राजीनामा मंजूर व्हावा यासाठी महापालिका कार्यालयात येत आहे. पण ठोस उत्तर मिळत नसल्याचं ऋतुजा लटके यांनी आज सांगितलं. त्या आज थेट महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. पण आयुक्तांच्या भेटीनंतरही अजूनही त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही.
आमची निष्ठा उद्धव ठाकरेंशीच, CM शिंदेंना भेटले नाही; ऋतुजा लटकेंनी स्पष्टचं सांगितलं!
महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आज ऋतुजा लटके आणि शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आज मुंबई महापालिकेत पोहोचले होते. ऋतुजा लटके यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विश्वनाथ महाडेश्वर यांनी ऋतुजा लटके या शिवसेनेच्या उमेदवार असून त्यांनी राजीनामा देऊन महिना उलटून गेला असला तरीही अद्याप तो स्विकारण्यात आलेला नाही. आजही राजीनामा स्विकारण्याबाबत ठोस उत्तर आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे शिंदे गटाकडून महापालिका आयुक्तांवर कोणता दबाव तर नाही ना? असा संशय आम्हाला येत आहे, असं विधान केलं आहे.
ऋतुजा लटकेंवर शिंदे गटाचा दबाव, राजीनामा मुद्दाम रखडवला; ठाकरे गटाची कोर्टात धाव!
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना अजूनही ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेकडून स्विकारण्यात आलेला नसल्यानं ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून राजीनाम्यावर निर्णय घेणं टाळलं जात असल्याचा आरोप करत ठाकरे गट आता थेट कोर्टात पोहोचला आहे. ठाकरे गटाकडून मुंबई हायकोर्टात याबद्दलची याचिका दाखल करण्यात आली असून उद्या यावर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मी ठाकरेंचीच निष्ठावंत शिवसैनिक, 'मशाल' चिन्हावरच लढणार
महापालिका आयुक्तांची आज भेट घेण्याआधी ऋतुजा लटके यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात ऋतुजा लटके यांनी आपण ठाकरेंचेच निष्ठावंत शिवसैनिक असून आपल्यावर कोणताही दबाव नाही असं स्पष्ट केलं आहे. तसंच अंधेरीची पोटनिवडणूक 'मशाल' चिन्हावरच लढणार असल्याचंही ऋतुजा यांनी सांगितलं. "माझ्यावर कोणताही दबाव नाही. तसंच मला कोणतीही ऑफर नाही. मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे आणि मी निवडणूक मशाल चिन्हावरच लढणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी राजीनामा मंजूर होण्यासाठी पालिका कार्यालयात येत आहे. तुमची सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. फक्त सही बाकी आहे असं सांगण्यात येत आहे. आज मी महापालिका आयुक्तांना भेटत आहे. त्यानंतर सविस्तर माहिती मिळू शकेल", असं ऋतुजा लटके म्हणाल्या होत्या.