Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची माघार; तरीही निवडणूक होणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 05:32 AM2022-10-18T05:32:27+5:302022-10-18T05:33:10+5:30

ऋतुजा लटके यांच्याविरोधात ६ उमेदवार अजूनही मैदानात 

Andheri Bypoll BJP retreats in Andheri by polls Election will be held anyway rutuja latke shivsena uddhav thackeray group murji patel bjp | Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची माघार; तरीही निवडणूक होणारच

Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची माघार; तरीही निवडणूक होणारच

googlenewsNext

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने अचानक माघार घेतल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठे बळ मिळाले. भाजपचे मुरजी पटेल यांनी माघार घेतली असली तरी लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात असल्याने ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होईल. 

मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर असताना अंधेरी पूर्वमध्ये भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे चित्र असतानाच भाजपने रण सोडण्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माघारीची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केली. एखाद्या आमदाराचे निधन झाल्यानंतर त्यांचे जवळचे नातेवाइक लढत असतील तर विरोधातील पक्षांनी निवडणूक न लढण्याची परंपरा राहिली आहे, आम्ही त्याचे पालन केले, असे बावनकुळे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. आजच्या माघारीचे श्रेय राज ठाकरे यांना आहे का असे पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, कोणाच्याही कोंबड्याने दिवस उजाडला तर माझी हरकत नाही, अशी मिश्कील टिप्पणी केली. 

वरिष्ठ नेत्यांशी चर्चेनंतर घेतली माघार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे प्रभारी सी. टी. रवी यांच्याशी चर्चा केली. रवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशीही चर्चा केली. रवी यांनी मुंबई भाजपच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली व नंतर माघारीचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुरजी पटेल समर्थक संतप्त
मुरजी पटेल यांच्या संतप्त समर्थकांनी भारतीय जनता पक्षाने त्यांना माघार घ्यायला लावल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीही केली. एक समर्थक माध्यमांसमोर रडला. घोषणा करण्यापूर्वी मुरजी पटेल यांना  आधी विश्वासात घ्यायला हवे होते, असे समर्थकांचे म्हणणे होते. 

माघारीची  कारणे? 

  • सहानुभूतीच्या लाटेचा फायदा ऋतुजा लटके यांना होईल याचा अंदाज भाजपला आला असावा.
  • पराभव पत्करावा लागला तर त्याचा थेट परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होऊन फटका बसू शकेल. ठाकरे सेनेचे मनोबल उंचावेल.
  • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आगामी निवडणुकीचा अंधेरी पूर्वमधील माघारीशी संबंध जोडला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल सूचक विधान केले. 
     

‘काहींनी मागून विनंती केली’

काहींनी समोरून विनंती केली काहींनी मागून विनंती केली, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. माघारीबाबत उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जाते. 

माझी भाजपकडे कोणतीही मागणी नव्हती. मी फक्त सल्ला दिला होता. सुचवल्यानंतर काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी आशा होती. तसा निर्णय घेतला याचा आनंद आहे.
शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

मी केलेल्या विनंतीला मान दिला व माघार घेतली याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. 
राज ठाकरे, अध्यक्ष मनसे

शरद पवार यांनी परंपरेची आठवण करून दिली होती. राज ठाकरे यांनीही पत्र दिले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या परंपरेचा आदर व्हावा, असे मत व्यक्त केले होते. भाजपने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला, याबद्दल आभार.
ॲड. अनिल परब, ठाकरे सेनेचे नेते 

रिंगणात असलेले : ऋतुजा लटके (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे), बाला नाडार (आपकी अपनी पार्टी), मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी), नीना खेडेकर (अपक्ष), फरहाना सय्यद (अपक्ष), मिलिंद कांबळे (अपक्ष), राजेश त्रिपाठी (अपक्ष). 

माघार घेतलेले : मुरजी पटेल (भाजप), निकोलस अल्मेडा (अपक्ष), साकिब जफर ईमाम मल्लिक (अपक्ष), राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी), चंद्रकांत मोटे (अपक्ष), पहलसिंग आऊजी (अपक्ष), चंदन चतुर्वेदी (अपक्ष). 

Web Title: Andheri Bypoll BJP retreats in Andheri by polls Election will be held anyway rutuja latke shivsena uddhav thackeray group murji patel bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.