Maharashtra Politics: काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून (Andheri Bypoll) राजकीय संघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या रणधुमाळीनंतर अखेर भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय सुकर मानला जात होता. मात्र, त्यानंतर आता एका अपक्ष उमेदवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.
भाजपने उमेदवारी मागे घेतली असली, तरी अद्याप अनेक अपक्ष उमेदवार या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात उमेदवारी मागे घेण्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करत ही पोटनिवडणूक रद्द करणयात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी या पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पत्राची दखल घेतली आहे. याबाबत आता काय निर्णय होतो, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
निवडणुकीतून माघार घेण्यासाठी धमकावले जातेय
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. तसे धमकीही देण्यात आल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला होता. याशिवाय अन्य अपक्ष उमेदवारांवर दबाव टाकून त्यांनाही निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून मुरजी पटेल यांनी अर्ज भरले होते. मात्र, भापजने या निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे या निवडणुकीतील चुरस संपली होती. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ०३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"