Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 06:18 AM2022-10-17T06:18:13+5:302022-10-17T06:19:06+5:30

राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; शरद पवारांनी केले आवाहन

Andheri Bypoll Political movement to speed up for uncontested elections rutuja ramesh latake shiv sena devendra fadnavis uddhav thackeray sharad pawar | Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग

Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग

Next

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरें गट) विरुद्ध भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती असा सामना रंगत असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांनी प्रिय मित्र देवेंद्र, अशी पत्राची सुरुवात करून, रमेश लटके एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भाजपने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावे, असे पत्रात म्हटले आहे. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे, असे पत्रात शेवटी नमूद केले आहे.

विचार करू : फडणवीस

  • राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राचा गांभीर्याने विचार करू, पक्षश्रेष्ठी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आम्ही राज ठाकरेंचा पाठिबा मागितला होता.
  • तेव्हा अशा निवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही, असे राज ठाकरेंनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपमध्ये मी एकटा निर्णय करू शकत नाही.
  • राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल, मला माझ्या सहकाच्यांशी आणि वरिष्ठाशी चर्चा करावी लागेल. यापूर्वी अशा काही पोटनिवडणुकांमध्ये योग्य प्रकारे विनंती करण्यात आल्यानंतर आम्ही माघार घेण्याची भूमिका घेतली होती, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
     

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवारांनी दाखविला : उद्धव ठाकरे
शरद पवारांनी जे मुद्दे मांडले, त्यातून पुन्हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा दाखविला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्याबद्दल सदैव आभारी राहील, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. या पत्रानंतर भाजपाला कळले असेल की आपण आपल्या संस्कृतीचा किती हास करतो आहे. आतातरी तरी भाजपला संस्कृतीची आठवण होईल, अशी खोचक प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली.

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके लढवत असल्याने आणि या जागेचा केवळ दीड वर्षांचा कालावधी शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी.
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

चांगला संदेश जावा
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य जर पोटनिवडणुकीत उभा राहणार असेल तर ती निवडणूक न लढवण्याचा निर्णय आपण घेतला होता. त्या निवडणुकीचा कालावधी पावणे पाच वर्ष शिल्लक असूनही महाराष्ट्रात चांगला संदेश जावा यासाठी आपण तो निर्णय घेतल्याचे पवारांनी सांगितले. मात्र, भाजपने जर आपला उमेदवार कायम ठेवला तरी त्यांना तो अधिकार असून त्याबाबत तक्रार करण्याचे काही कारण नसल्याचेही पवार म्हणाले.

खेळात राजकारण आणत नाही
मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी नावाचे गृहस्थ होते. ते माझ्या बैठकांना हजर असायचे. त्यांचा पक्ष तुम्हाला ठाऊक आहे आणि माझा पक्ष तुम्हाला ठाऊक आहे. खेळात आम्ही कुणी कधीही राजकारण आणत नाही, राजकीय भूमिका घेत नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

आशिष शेलार - राज ठाकरे भेट

  • भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपला पाठिया जाहीर करावा, ही विनंती करायला आशिष शेलार राज ठाकरे यांना भेटल्याचे समजचे.
  • परंतु या भेटीनंतरच राज ठाकरेंनी निवडणूक बिनविरोध घेण्याचे आवाहन करणारे पत्र जारी केले. त्यामुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात दिवसभर वेगळीच चर्चा सुरु होती. या भेटीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते.

राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल, तर मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल. यापूर्वी विनती केल्यानंतर आम्ही माघार घेण्याची भूमिका घेतली होती.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Web Title: Andheri Bypoll Political movement to speed up for uncontested elections rutuja ramesh latake shiv sena devendra fadnavis uddhav thackeray sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.