अंधेरी-चर्चगेट, गोरेगाव-पनवेल रोजची कसरत; रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:24 AM2024-06-28T10:24:39+5:302024-06-28T10:25:13+5:30
गोरेगावहून हार्बरमार्गे पनवेलकडे आणि अंधेरीवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
मुंबई: गोरेगावहून हार्बरमार्गे पनवेलकडे आणि अंधेरीवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. गाडीत चढतानाही मोठी कसरत करावी लागते. यामुळे गोरेगाव-पनवेल आणि अंधेरी-चर्चगेट या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. पश्चिम रेल्वेवर अंधेरी हे महत्त्वाचे स्थानक आहे. इच्छितस्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी घाटकोपर-वर्सोवा मेट्रोने प्रवास करत अंधेरी गाठतात.
यामुळे अंधेरीत प्रवाशांची गर्दी होते. पूर्वी अंधेरी-चर्चगेट-अंधेरी या मार्गावर पश्चिम व मध्य रेल्वेची हार्बर लोकल धावत होती. मात्र, गोरेगावपर्यंत विस्तार झाल्यावर अंधेरी-चर्चगेट-अंधेरी ही अनेक वर्षांपासून सुरू असलेली रेल्वे सेवा बंदच झाली. अंधेरी-चर्चगेट-अंधेरी या मार्गावर पश्चिम रेल्वेच्या खूपच कमी रेल्वे गाड्या धावतात. त्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होते. हार्बर मार्गावर गोरेगाव-पनवेलदरम्यान लोकलची सेवा खूपच कमी आहे. गोरेगावहून हार्बरमार्गे वाशी, बेलापूर, पनवेलकडे नोकरी, व्यवसाय तसेच उच्च शिक्षणानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
अंधेरीवरून लोकलमध्ये चढता येत नाही, तर उतरतांना देखील कसरत करावी लागते. या मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता अंधेरी-चर्चगेट-अंधेरी या मार्गावर पश्चिम व मध्य रेल्वेची हार्बर लोकलची संख्या वाढवावी. - अजित दिघे, अध्यक्ष, आम्ही अंधेरीकर.
प्रवाशांची रोजची होणारी दमछाक रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावेत. यासाठी आगामी नवीन वेळापत्रकात गोरेगाव-पनवेलदरम्यान अप-डाऊन लोकल फेऱ्या वाढवाव्या. उदय चितळे, अध्यक्ष, गोरेगाव प्रवासी संघ.
सध्या सकाळी पाच आणि सायंकाळी पाच अशा १० फेऱ्या या मार्गावर होतात. परिणामी, प्रवाशांना गोरेगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकलने प्रवास करून वडाळा येथे उतरावे लागते. मग वडाळ्यावरून लोकल बदलून पनवेल येथे जावे लागते. त्यात प्रवाशांचा वेळ वाया जातो.