लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ संवादलेखक व गीतकार जावेद अख्तर यांच्या कथित बदनामी प्रकरणाच्या सुनावणीस अभिनेत्री कंगना रनौत प्रकृतीचे कारण देत पुन्हा मंगळवारी गैरहजर राहिली. त्यावर कोर्टाने यापुढील गैरहजर राहिल्यास वॉरंट काढण्याचा इशारा दिला.
या प्रकरणाची सुनावणी अंधेरी न्यायदंडाधिकारी कोर्टात सुरू आहे. कंगनाला कोरोना चाचणी करायची आहे, असे कारण तिचे वकील ॲड. रिझवान सिद्दीकी यांनी दिले. तथापि, फेब्रुवारीत खटला सुरू झाल्यापासून गैरहजर राहण्याची कंगनाची ही आठवी खेप आहे. गैरहजर राहून कायदेशीर कार्यवाही लांबविण्याचा हा प्रयत्न आहे, असा युक्तिवाद अख्तर यांचे वकील जय भानुशाली यांनी केला. त्यावर, कंगनाची चाचणी निगेटिव्ह आल्यास ती पुढील तारखेस हजर राहील, असे सिद्दीकी यांनी सांगितले. पुढील सुनावणी २० सप्टेंबरला ठेवली असून, त्यास तिला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. आजच्या सुनावणीला जावेद अख्तर आणि शबाना आझमी दोघेही हजर होते.
असे आहे प्रकरण
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगनाने टीव्हीवर मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने जावेद अख्तर यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान करीत अख्तर यांच्यावर अनेक आरोप केले होते.