अंधेरी, धारावी, भांडुपमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू, महापालिकेची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 06:07 AM2020-09-13T06:07:20+5:302020-09-13T06:07:48+5:30
पश्चिम उपनगरात विशेषत: इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे.
मुंबई : ‘मिशन झिरो’अंतर्गत पश्चिम उपनगरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यात महापालिकेला गेल्या महिन्यात यश आले होते. मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अंधेरी ते दहिसर या विभागात रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईतील आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण (९८२४) मालाड पश्चिम विभागात आढळून आले आहेत. तर सर्वाधिक ५६१ मृत्यू जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या विभागात झाल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ धारावी-दादर, भांडुप, कुर्ला या विभागात मृतांचा आकडा अधिक आहे.
पश्चिम उपनगरात विशेषत: इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. तसेच एकूण प्रतिबंधित क्षेत्रांपैकी अंधेरी ते दहिसर या विभागातील प्रमाण ४५ टक्के आहेत. कोरोनाचा प्रसार या पट्ट्यात रोखण्यासाठी महापालिकेने ‘मिशन झिरो’, ‘डॉक्टर आपल्या दारी’, ‘फिव्हर क्लिनिक’ असे अनेक उपक्रम गेल्या दोन महिन्यांत आयोजित केले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. मात्र गणेशोत्सव काळात तसेच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पश्चिम उपनगरातील रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे.
लोकसंख्या अधिक असलेल्या के पूर्व म्हणजे जोगेश्वरी आणि अंधेरी पूर्व विभागात रुग्णांची संख्या आतापर्यंत अधिक होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पी उत्तर विभागात म्हणजेच मालाड पश्चिम या विभागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीत मालाडमध्ये ७६३ रुग्ण वाढले, तर बोरीवलीत तब्बल १०४८ रुग्ण वाढले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५८ दिवसांवर आला आहे. तर गोरेगाव पश्चिम आणि बोरीवली या विभागात ४३ दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.
मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५८ दिवसांपर्यंत खाली आला आहे. दैनंदिन रुग्णवाढ १.२१ टक्के आहे.
पश्चिम उपनगरांमध्ये लोकसंख्या शहर, पूर्व उपनगराच्या तुलनेत अधिक असल्यामुळे येथील रुग्णसंख्याही अधिक असल्याचे दिसून येते.
पश्चिम उपनगरांमध्ये झोपडपट्टीपेक्षा इमारतींमध्ये रुग्णांची संख्या ७० टक्के असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फिव्हर कॅम्प सुरू केले.
११ सप्टेंबरपर्यंत - सर्वाधिक मृत्यू
विभाग एकूण रुग्ण सक्रिय मृत्यू
के पूर्व (जोगेश्वरी, अंधेरी पूर्व) ९७९३ १३५७ ५६१
जी उत्तर (धारावी, दादर) ९१३७ ११९६ ५१९
एस (भांडुप) ८५४८ १२२० ४८८
एल (कुर्ला) ६६१८ ७४० ४७३
जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी) ६७५७ ७२८ ४२६
एन (घाटकोपर) ८३५० १२९७ ४२६
सर्वाधिक रुग्ण...
विभाग आतापर्यंत सक्रिय
पी उत्तर मालाड ९८२४ १२३७
आर मध्य बोरीवली ९८६४ १९५८
के पश्चिम विलेपार्ले, अंधेरी प. ९४८५ १६४३
दैनंदिन रुग्णवाढीचा दर
विभाग रुग्णवाढ (टक्के)
पी दक्षिण गोरेगाव १.६४
आर मध्य-बोरीवली १.६२
टी-मुलुंड १.५४
आर दक्षिण-कांदिवली १.५२
आर उत्तर-दहिसर १.५१