Join us  

मराठी टक्का सर्वाधिक, पण इतरही लक्षणीय, असं आहे अंधेरी पूर्व मतदारसंघातील भाषिक समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 3:38 PM

Andheri East Assembly By Election: अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये झालेलं बंड, त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतर आणि बदललेली राजकीय समीकरणे यांच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.

ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. मात्र मिश्र लोकवस्ती असलेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये भाषिक समीकरण हे निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांचा टक्का सर्वाधिक असला, तरी इतर भाषिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे विजय मिळवण्यासाठी उमेदवारांना योग्य भाषिक समीकरण जुळवून आणावे लागणार आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार या मतदारसंघामध्ये मराठी भाषिक मतदारांची संख्या सुमारे १ लाख ५ हजार ५०० च्या आसपास आहे. तर त्याखालोखाल उत्तर भारतीय मतदार हे सुमारे ५८ हजार ६०० आहेत. मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्याही सुमारे ३७ हजार ९०० एवढी आहे. येथील भाषिक आकडेवारीत गुजराती समाज हा चौथ्या स्थानावर आहे. त्यांची संख्या सुमारे ३३ हजार ७०० एवढी आहे. तर दक्षिण भारतीयांची संख्या १९ हजार ५०० च्या आसपास आहे. ख्रिश्चन मतदारांची संख्या ही १४ हजार ९०० एवढी आहे. तर इतर मतदार हे हजारांच्या आसपास आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळण्यासाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांना कुठल्याही एका भाषिक मतदारांवर किंवा समाजावर अवलंबून राहता येणार नाही.

दरम्यान, मागच्या दोन विधानसभा निवडणुकील मतदानाचे आकडे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अनुकूल दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे गेल्या दोन निवडणुकांमध्ये रमेश लटके यांनी येथून बाजी मारली होती. तसेच त्यांना मिळालेल्या मतांची संख्याही लक्षणीय होती. त्यातच आता महाविकास आघाडीतून काँग्रेसने पाठिंबा दर्शवल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचे पारडे जड आहे. या दोन्ही पक्षांना २०१९ मध्ये मिळालेल्या मतांची बेरीज ही विरोधी मुरजी पटेल यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भाजपाला अंधेरीत कमळ फुलवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागू शकते. 

टॅग्स :अंधेरी पूर्वनिवडणूकशिवसेनाभाजपा