मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपाने ही निवडणूक लढवू नये, तसेच ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केलं होतं. त्याला आता भाजपानेही प्रतिसाद दिला आहे. या पोटनिवडणुकीबाबत पक्षाने कोणता निर्णय घ्यावा, हे पक्षाचं नेतृत्व निश्चित करेल, असं विधान भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे.
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रानंतर प्रसाद लाड त्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आम्ही राज ठाकरे यांनी पत्र लिहून सांगितलेल्या मताच आदर करतो. मात्र हे त्यांचं वैयक्तिक किंवा त्यांच्या पक्षाचं मत असू शकतं. पण भाजपाने कोणता निर्णय ध्यावा याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस आणि अशिष शेलार यांच्याकडे आहे, ते त्याबाबत निर्णय घेतील.
दरम्यान, अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी मनसे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अखेर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपलं मत कळवलं आहे. या पत्रात ते म्हणाले होते की, “आमदार कै रमेश लटके य़ांच्या दुर्देवी निधनानंतर आज अंधेरी पूर्व या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं त्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.