मुंबई - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर जून महिन्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले होते. दरम्यान, न्यायालयीन लढाई सुरू असताना आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं आहे. आता पक्षफुटीनंतर आणि नवे नाव आणि नवं चिन्ह मिळाल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्यासमोर पहिलं आव्हान उभं राहिलं आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली राजकीय उलथापालथ, आरोप प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे यांच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक ही राज्याच्या राजकारणाला कटालणी देणारी ठरणार आहे. हा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी बालेकिल्ला राहिलेला आहे. २०१९ आणि २०१४च्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये येथे शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके विजयी झाले होते. तर २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना कडवी टक्कर दिली होती. आता शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)सोबत महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष सोबत असल्याने त्याचाही फायदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळू शकतो.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने गेल्यावेळी अपक्ष म्हणून लढलेले मुरजी पटेल यांचं नाव निश्चित केले आहे. एकंदरीत चित्र पाहता ही निवडणूक दुरंगी होण्याची शक्यत आहे. दरम्यान, या मतदारसंघातील गेल्या दोन निवडणुकांमधील मतांची आकडेवारी पाहिल्यास हे मतांचं गणित उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बऱ्यापैकी अनुकूल असल्याचं दिसत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके हे ६२ हजार ७७३ मते घेऊन विजयी झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांचा जवळपास १७ हजार मतांनी पराभव केला होता. पटेल यांना ४५ हजार ८०८ मतं मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार अमिन कुट्टी यांनी २७ हजार ९५१ मते मिळाली होती. आता २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्र असल्याने या दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज ही ९० हजार ७२४ एवढी होते. ही संख्या यावेळी भाजपाकडून निवडणूक लढवत असलेल्या मुरजी पटेल यांना २०१९ मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जवळपास दुप्पट आहे.
तर २०१४ च्या निवडणुकीत रमेश लटके यांनी भाजपाचे उमेदवार सुनील यादव यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत रमेश लटके यांना ५२ हजार ८१७ मते मिळाली होती. तर सुनील यादव यांना ४७ हजार ३३८ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांनाही तब्बल ३७ हजार ९२९ मते मिळाली होती. मात्र आता महाविकास आघाडी असल्याने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या एकत्रित मतांची बेरीज केल्यास ती ९० हजार ७४६ एवढी होते. हा आकडासुद्धा तेव्हा भाजपाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच यावेळीही मतदारांचा कल कायम राहिल्यास शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे. तसेच रमेश लटके यांच्या निधनामुळे मतदारांमध्ये असलेली सहानुभूतीची लाट हीसुद्धा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी जमेची बाजू ठरू शकते.
मात्र असं असलं तरी मदारांचा कल हा प्रत्येक निवडणुकीनुसार बदलत असतो. त्यातच शिवसेनेत फूट पडून दोन पक्ष निर्माण झाल्याने आणि त्यातील एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष भाजपासोबत असल्याने काही प्रमाणात मतांची फाटाफूट होऊ शकते. मात्र सध्यातरी कागदावरील आकडेवारीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारडे जड दिसत आहे. मात्र आता मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.