Andheri East Bypoll: अनेकजण इच्छूक पण अंधेरीत आयारामला तिकीट? उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 11:58 AM2022-10-11T11:58:22+5:302022-10-11T12:00:00+5:30

Andheri East Bypoll: अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली असून, उमेदवारीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे.

andheri east bypoll bjp leader disappointed over candidature to murji patel by party | Andheri East Bypoll: अनेकजण इच्छूक पण अंधेरीत आयारामला तिकीट? उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर

Andheri East Bypoll: अनेकजण इच्छूक पण अंधेरीत आयारामला तिकीट? उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर

Next

Maharashtra Politics: आताच्या घडीला अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे अधिकृत नाव आणि चिन्ह गोठवत नवे नाव आणि चिन्ह दिले. शिंदे गटालाही नवे नाव मिळाले आहे. मात्र, या पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजीचा सूर असून, अंतर्गत धुसपूस वाढत जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षात अनेकजण इच्छूक असताना आयारामला तिकीट का देण्यात येत आहे, अशी विचारणा आता भाजपतील नेते पक्ष नेतृत्वाला करत असल्याचे सांगितले जात आहे. 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे ताकद लावणार आहे. 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या नव्या नावासह आणि 'मशाल' या नव्या निवडणूक चिन्हासोबत ठाकरे रिंगणात उतरत आहेत. ऋतुजा लटके यांना ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून आणू, असा शब्द काँग्रेस नेत्यांनी दिला. तर, आदित्य ठाकरे यांनीही यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे म्हटले जात आहे. यातच भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

भाजपकडून उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा नाही

भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी भाजपकडून आयात केलेले मुरजी पटेल यांना संधी दिली जाणार आहे. मात्र या निर्णयामुळे काही इच्छुक माजी नगरसेवक नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच भाजपकडून उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही नाराजी दूर करण्याची जबाबदारी भाजपच्या अनेक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती असल्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे नाराज झालेल्या पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केल्यामुळे ही खरेच बंडखोरी होती की, पक्षाच्या संमतीने अपक्ष लढवलेली निवडणूक, असा सवालही विचारला जात होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: andheri east bypoll bjp leader disappointed over candidature to murji patel by party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.