अंधेरी पूर्वची निवडणूक शांत आणि निष्पक्ष वातावरणात होणार, उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती

By मनोहर कुंभेजकर | Published: October 19, 2022 06:45 PM2022-10-19T18:45:58+5:302022-10-19T18:56:50+5:30

Andheri East Assembly By Election: महाराष्ट्र विधानसभेच्या  '१६६-अंधेरी पूर्व' मतदारसंघाची पोटनिवडणुक ही दि, ३ नोव्हेंबर  रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या कालावधी दरम्यान पूर्ण शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडतील; असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांनी व्यक्त केला.

Andheri East election will be held in a peaceful and fair atmosphere, Suburban Collector Nidhi Chaudhary informed | अंधेरी पूर्वची निवडणूक शांत आणि निष्पक्ष वातावरणात होणार, उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती

अंधेरी पूर्वची निवडणूक शांत आणि निष्पक्ष वातावरणात होणार, उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती

Next

- मनोहर कुंभेजकर
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या  '१६६-अंधेरी पूर्व' मतदारसंघाची पोटनिवडणुक ही दि, ३ नोव्हेंबर  रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या कालावधी दरम्यान पूर्ण शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडतील; असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांनी व्यक्त केला. या पोटनिवडणुकीसाठी शासनाने पूर्ण तयारी केली असून अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदान केंद्रावर वेळेत पोहोचून मतदान करावे, असेही आवाहन त्यांनी नुकतेच केले आहे.

अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात श निधी चौधरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजित साखरे हे देखील विशेषत्वाने उपस्थित होते.

ही पोटनिवडणूक निष्पक्षपणे होण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयांच्या अंतर्गत जवळपास २ हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दल, राखीव पोलीस दल आणि अन्य सुरक्षा व्यवस्था देखील सुसज्ज व तैनात असणार आहे. मतदान आणि मतमोजणी करतांना कोणतीही समस्या येणार नाही याकरिता सर्व कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रांवर येण्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने उद्वाहन (लिफ्ट) आणि उतार मार्गीका (रॅम्प) यांचीही सोय केली आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना या काळात लागणाऱ्या सर्व आवश्यक प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी ‘सुविधा’ उपलब्ध आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी महोदयांनी यावेळी पत्रकारांना दिली.

आजमितीस बहुतेक मतदारांकडे 'मतदार कार्ड' आहे. तथापि, ज्या मतदारांकडे 'मतदार कार्ड' नसेल, त्यांनी 'भारत निवडणूक आयोग' यांनी निश्चित केलेली व छायाचित्रासह असणा-या १२ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदारांकडे असणे आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी सदर संदर्भातील माहितीची जाहिरात वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून ३ वेळा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

निष्पक्ष आणि सुरक्षित निवडणूक होण्यासाठी आयोगाकडून तीन केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. या अनुषंगाने एखाद्या नागरिकांस निवडणूकी संदर्भात काही तक्रार असल्यास त्या नागरिकांनी 'सी-व्हिजिल' या ॲपवर किंवा केंद्रीय निरीक्षक सध्या राहत असलेल्या इंडियन ऑईल गेस्ट हाऊस, वांद्रे कुर्ला संकुल (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) या ठिकाणी त्यांची भेट घेऊन, आपली तक्रार नोंदवावी, असे त्यांनी सांगितले.

अंधेरी पूर्व या मतदारसंघाकरिता २ लाख ७१ हजार ५०२ मतदार संख्या असून याकरिता २५६ मतदान केंद्रे आहेत. यात २३९ मतदान केंद्र तळमजल्यावर असून १७ केंद्रे पहिल्या मजल्यावर आहेत. पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रांच्या ठिकाणी उद्वाहनाची अर्थात 'लिफ्ट'ची सुविधा उपलब्ध आहे. या मतदारसंघात एकही असुरक्षित, संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. ही पोटनिवडणूक १६६ - अंधेरी पूर्व या मतदारसंघात असून मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उर्वरित भागात आचारसंहिता लागू नाही अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.
 

Web Title: Andheri East election will be held in a peaceful and fair atmosphere, Suburban Collector Nidhi Chaudhary informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.