गोखले-बर्फीवाला पूल १ जुलैपासून खुला? पालिकेकडून दोन्ही पुलांच्या जोडणीची मोहीम फत्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:22 AM2024-06-20T10:22:13+5:302024-06-20T10:24:32+5:30
हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर करून जोडण्याचे अतिशय आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिम यांना जोडणाऱ्या सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग उचलून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर पातळीवर जुळवण्यासाठी हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर करून जोडण्याचे अतिशय आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले आहे.
याअंतर्गत बर्फीवाला पुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलिमीटर आणि दुसऱ्या बाजूला ६५० मिलिमीटरवर उचलण्यात आला आहे. या जोडणीच्या कामासाठी जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असणारे नियोजन आणि अथक प्रयत्नांना या महत्त्वाच्या टप्प्यात यश आले आहे. काँक्रीट क्युरिंगच्या कामानंतर १ जुलैला दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरू करण्याची तयारी महापालिकेकडून करण्यात येत आहे.
बर्फीवाला आणि गोखले पुलांच्या जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या स्टिचिंगच्या काँक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतर त्यापुढील सलग सहा तास पाऊस न पडणे अपेक्षित व आवश्यक होते. विशेष म्हणजे हे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात त्यापुढील १२ तासांपेक्षा अधिक कालावधीदरम्यान पाऊस न पडल्याने काँक्रिटीकरणाचे व स्टिचिंगचे काम विनाअडथळा करणे शक्य झाले, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
असे जुळवले दोन उड्डाणपूल -
१) बर्फीवाला उड्डाणपूल एका बाजूला १,३९७ मिलिमीटर व दुसऱ्या बाजूला ६५० मिलिमीटरवरच्या दिशेने उचलण्यासाठी ‘हायड्रॉलिक जॅक’ आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर करण्यात आला.
२) बर्फीवाला उड्डाणपुलाखाली पेडेस्टल (आधार देणारे खांब) वापरण्यात आले आहेत. एकूण दोन ‘पेडस्टल’चा आधार देत जोडणी करावयाचा भाग हा १,३९७ मिमी या उड्डाणपुलाचा गर्डर वर उचलण्यात आला आहे. त्यासोबतच सहा नवीन बेअरिंगही त्या साच्यात बसविण्यात आल्या.
३) पेडस्टलला देण्यात आलेले ‘बोल्ट’ हे सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाच्या पिलरशी जुळणे हे अतिशय महत्त्वाचे आव्हान होते.
४) अवघ्या २ मिलिमीटर जागेच्या अंतरामध्ये अतिशय अचूकपणे हे दोन्ही पेडेस्टल जुळवण्याचे आव्हान पूल विभागाचे अभियंता आणि सल्लागारांच्या तांत्रिक चमूने अतिशय नियोजनबद्धरीत्या व शास्त्रशुद्ध पद्धतीने जुळवून आणले. व्हिजेटीआय, आय.आय.टी. आणि स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सल्टिंग इंजिनिअर्स या सल्लागारांच्या देखरेखीखाली हे आव्हानात्मक काम करण्यात आले.