अंधेरीतील गोखले-बर्फीवाला पुलाची जोडणी जूनअखेर; अंतिम अहवाल रविवारपर्यंत सादर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:48 AM2024-04-05T09:48:20+5:302024-04-05T09:51:25+5:30
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल व सीडी बर्फीवाला पूल येत्या जूनअखेर जोडला जाणार आहे.
मुंबई :अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल व सीडी बर्फीवाला पूल येत्या जूनअखेर जोडला जाणार आहे. पुलासाठी व्हीजेटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईकडून रिपोर्ट मागविण्यात आला असून, येत्या रविवारपर्यंत अंतिम तो सादर होणार आहे. व्हीजेटीआयच्या अहवालाप्रमाणेच पूल जोडणीचे काम होणार असून, सुरक्षिततेसाठी, मजबुतीकरणासाठी आणि कमी वेळात जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी आयआयटीकडून काही पर्याय सुचविण्यात येणार आहेत. त्यानंतर लगेचच काम हाती घेऊन पुढील दोन-तीन महिन्यांत गोखले पुलाचा निर्णय मार्गी लागेल, असा विश्वास मुंबई पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत, बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहू पर्यंतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता.
मात्र, काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला. या पार्श्वभूमीवर पालिकेने या समस्येवर उपाय सुचविण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयचा सल्ला मागितला होता. व्हीजेटीआयच्या अहवालात बर्फीवाला पूल चांगल्या स्थितीत असून, तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. बर्फीवाला पुलाचे स्लॅब उंच करण्यासाठी जॅकचा वापर करून पुलाला गोखले पुलाशी जोडता येईल.
पुलाचे चार स्तंभ खालून वर करण्याच्या अभियांत्रिकी तंत्राचा वापर करणे शक्य आहे, अशी शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, पालिकेला स्वतःचा आराखडा तयार करता आला तरी तज्ज्ञांचा आणखी एक सल्ला म्हणून आयआयटीच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन यात समाविष्ट केले जाणार आहे. पुलाच्या संपूर्ण जोडणीत आयआयटी व व्हीजेटीआयचे तज्ज्ञ पाहणीसाठी उपस्थित राहतील याची काळजी घेतली जाणार आहे.
नव्याने निविदा प्रक्रिया-
१) गोखले व बर्फीवाला पुलाच्या जोडणीसाठी येणाऱ्या खर्चासाठी पालिका नव्याने निविदा करणार असून, ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जरी या कामाला सुरुवात झाली तरी जून अखेर हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मुदत दिली जाईल. ज्यामुळे नागरिकांसाठी पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.
दुसऱ्या गर्डरचे कामही सुरू राहणार-
२) या सगळ्यामध्ये गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरसाठीचे साहित्य पोहोचत असल्याने तेही काम सुरू राहणार आहे. दुसऱ्या बाजूच्या गर्डरसाठी लागणाऱ्या ३२ स्पॅन पैकी जवळपास ५ स्पॅन मुंबईत पोहोचले आहेत. आता त्यांचे एकत्रीकरण करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.