Join us

गोखले - बर्फीवाला पुलाचे सूत काही केल्या जमेना! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 10:46 AM

‘व्हीजेटीआय’च्या सूचनांनुसार पुलाची जोडणी : महापालिका

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पूल यांच्यातील अंतरामुळे मुंबई पालिकेच्या अभियांत्रिकी कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर पालिकेच्या अभियंता विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. बर्फीवाला पूल हा गोखले पुलाशी जोडण्यासाठी सद्यस्थितीला स्वामी विवेकानंद मार्ग आणि जुहू येथून अंधेरी स्थानकाच्या दिशेने जाणारा मार्ग येथे दुरुस्ती किंवा अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त जागेची  आवश्यकता आहे. त्यामुळे गोखले पुलाच्या कामासोबतच जोडणीचे काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. परिणामी, गोखले आणि बर्फीवाला पुलाचे सूत काही जमत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्ग येथे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. नव्याने बांधलेल्या गोखले पुलाचा उतार हा स्वामी विवेकानंद मार्गाच्या दिशेने असून, उत्तर दिशेचा बर्फीवाला पुलाचा उताराचा भाग गोखले पुलाच्या दिशेने आला आहे. 

गोखले पुलाच्या पालिका क्षेत्रातील पुनर्बांधणीचे कार्यादेश २० एप्रिल २०२० रोजी देण्यात आले. तर, पुलाच्या पुनर्बांधणीचे काम १५ मार्च २०२१ रोजी सुरू झाले.

सल्लागारांनी सांगितले ः प्रचलित नियम आणि वाहन सुरक्षा याबाबी धोकादायक असल्याने गोखले पुलावर रेल्वे भागातील खांब क्रमांक ५ आणि बर्फीवाला जंक्शन हे जोडणीसाठी शक्य नसल्याचे सल्लागारांनी सांगितले.

जुन्या पुलाच्या निष्कासनाची कार्यवाही पूर्व दिशेला सुरू असताना रेल्वेने २४ मार्च आणि १६ एप्रिल २०२१ रोजी रेल्वे भागातील पुलाचे पुनर्बांधणीचे काम आवश्यक असल्याचे पालिकेला कळविले.  

त्यानंतर पुन्हा पालिकेने आराखडा तयार करून रेल्वे प्रशासनाने त्याला ३० मे २०२२ रोजी मंजुरी दिली. आराखड्यात रेल्वे भागातील पुलाच्या ८.४५ मीटरच्या उंचीच्या आराखड्याला मंजुरी दिली होती. परिणामी रेल्वे हद्दीतील पुलाची उंची ही २.७३ मीटरने वाढली.

त्यामुळे सद्यस्थितील रेल्वे भागातील पुलाची पातळी व बर्फीवाला जंक्शन येथे पुलाची पातळी यामध्ये दोन्ही पुलाच्या उंचीतील फरक  २.८३ मीटर इतका आहे.

दोन्ही पुलांचे चढ-उतार हे एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे दोन्ही पुलांचे उतार पाहता बर्फीवाला पूल हा गोखले पुलाला जोडणे शक्य नाही, असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. शिवाय अतिशय खोल उतार असल्याने तेथे अपघाताची शक्यता अधिक आहे. गोखले, बर्फीवाला पुलांच्या जोडणीसाठी पालिका, रेल्वे प्राधिकरण, सल्लागार यांच्यासोबत बैठका सुरू आहेत. व्हीजेटीआय संस्थेकडून सुचविण्यात कार्यपद्धतीनुसार हे काम हाती घेण्यात येईल, असे पालिकेने सांगितले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका