मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोखले पुलाचा पहिला गर्डर ३ डिसेंबर रोजी रेल्वे रुळावर स्थापन करण्यात आला. आता हा गर्डर ७.५ मीटर खाली आणण्याच्या कामाला येत्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. या वेळापत्रकानुसार कामे पार पडल्यास १५ फेब्रुवारीपर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली होण्याची शक्यता आहे.
गोखले पुलासाठी गर्डर स्थापित करणे हे अभियंत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक काम होते. पश्चिम रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्वेने सूचना दिल्याप्रमाणे मे. राइट्स लि. यांच्या तांत्रिक देखरेखीखाली हे काम प्रगतिपथावर आहे. चर्चगेटच्या दिशेच्या मार्गिकेवर बसवलेला गर्डर विरारच्या दिशेच्या मार्गिकेवर सरकविण्याचे काम २० डिसेंबरला पूर्ण झाले. त्यानंतर हा गर्डर खाली उतरविण्याचे काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. हा गर्डर ७.५ मीटर खाली आणून तो पालिकेने तयार केलेल्या पोहोच रस्त्याला जोडण्यात येणार आहे. गर्डर खाली आणण्यासाठीच्या पूर्वतयारीची कामे पूर्ण झाली आहेत. एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळया पसरवून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येईल.
३ तासांत ५५० मिमी गर्डर खाली येणार :
रेल्वे परिसरातील ७.५ मीटर उंचीवरून पूल खाली आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने ११ दिवसांचा ब्लॉकचा कालावधी मंजूर केला आहे.
पश्चिम रेल्वेच्या विशेष ब्लॉकमध्ये दररोज रात्रीच्या वेळेतील तीन तासात सरासरी ५५० मिमी गर्डर हा खाली आणणे शक्य होईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
गोखले पुलाच्या या १३०० टन वजनी गर्डरसाठी ७.५ मीटर खाली उतरवण्याच्या कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुलाचे क्युरिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.