काॅर्पाेरेट कार्यालयांसाठी अंधेरीला मोठी मागणी; बँकिग, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग कंपन्यांचा वाढताेय सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:36 PM2023-11-08T12:36:32+5:302023-11-08T12:36:45+5:30
विशेष म्हणजे, नरिमन पॉइंट, बीकेसी, लोअर परळ, वरळी यानंतर आता विविध कंपन्यांचा अंधेरी येथे कार्यालये सुरू करण्याचा कल अधिक असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई : मुंबईत निवासी जागांच्या मागणीत वाढ नोंदली जात असताना कार्यालयीन जागांच्या खरेदी अथवा भाडेतत्वावर घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत मुंबईत तब्बल एक लाख तीस हजार चौरस फूट जागांवर विविध कंपन्यांची कार्यालये थाटली गेली आहेत.
विशेष म्हणजे, नरिमन पॉइंट, बीकेसी, लोअर परळ, वरळी यानंतर आता विविध कंपन्यांचा अंधेरी येथे कार्यालये सुरू करण्याचा कल अधिक असल्याचे दिसून आले आहे. कोरोनामध्ये वर्क फ्रॉम होमचा ट्रेन्ड रुजला होता. त्या कालावधीत अनेक कंपन्यांनी कार्यालये बंद केली होती अथवा आकारमान कमी केले होते. मात्र, आता पुन्हा कार्यालयातून काम करण्याचा ट्रेन्ड रुजताना दिसत आहे.
बांधकाम क्षेत्रातील घडामोडींचा वेध घेणाऱ्या सीबीआरई कंपनीच्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत मुंबईत कार्यालये सुरू केलेल्या क्षेत्रांमध्ये बँकिंग व वित्तीय संस्थांनी सर्वाधिक म्हणजे ३१ टक्के जागा ताब्यात घेत कार्यालये सुरू केली आहेत. त्यापाठोपाठ तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कार्यालये सुरू केली असून, त्यांचे प्रमाण हे २८ टक्के इतके आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत कंपन्यांनी देखील १३ टक्के जागा भाडेतत्वावर घेत कार्यालये सुरू केली आहेत.
१८% व्यावसायिक मालमत्तांचे प्रमाण
ज्या कंपन्यांनी कार्यालये भाडेतत्वावर घेतली आहेत त्यांनी किमान तीन हजार चौरस फूट ते कमाल ५० हजार चौरस फुटांपर्यंत कार्यालये स्थापन केलेली आहेत. अंधेरीतील भाडेतत्वावरील जागांच्या किमतीत गेल्या वर्षभरात वाढ नोंदली गेली असून, तेथील दर आता प्रति महिना प्रति चौरस फूट १२५ रुपयांवर पोहोचले आहेत.
मुंबईत सध्या मेट्रोची जी कामे सुरू आहेत अथवा जी पूर्ण झालेली आहेत त्यामध्ये अंधेरी हे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. तेथील जोडणी वाढल्यामुळेच तेथे कार्यालये स्थापन करण्यास कंपन्या प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, चालू वर्षात पहिल्या दहा महिन्यांत मुंबईत एक लाख चार हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी झाली असून, त्यामध्ये निवासी मालमत्तांचे प्रमाण ८२ टक्के इतके आहे तर व्यावसायिक मालमत्तांचे प्रमाण १८ टक्के इतके आहे.