यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी, जोगेश्वरी ‘पूरमुक्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:21 AM2020-03-04T02:21:35+5:302020-03-04T02:21:39+5:30
दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी भागात पाणी तुंबत असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसतो. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते.
मुंबई : प्रत्येक पावसाळ्यात पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या पश्चिम उपनगरातील गजबजलेल्या अंधेरी, वर्सोवा आणि जोगेश्वरी परिसराला यंदा दिलासा मिळेल, असा दावा पालिका प्रशासन करीत आहे. या परिसरातील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार, पर्जन्य जलवाहिन्या आणि कल्व्हर्टच्या सुधारणेचे काम केले
जाईल. त्यामुळे पावसात पाण्याचा निचरा जलद गतीने होईल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी
भागात पाणी तुंबत असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसतो. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. याबाबत स्थानिकांच्या आॅनलाइन तक्रारी आल्यानंतर महापालिकेने या समस्येचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, हा परिसर पूरमुक्त करण्यासाठी काही उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या भागात पर्जन्य जलवाहिन्या आणि नाल्यांच्या भिंती पडल्या असून,
काही ठिकाणी त्या मोडकळीस आल्याचे या अभ्यासादरम्यान दिसून आले. मोडकळीस आलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांवर सिमेंट-काँक्रीटचे
मजबूत बांधकाम करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. कंत्राटाचा कालावधी आणि पावसाळ्याच्या कालावधीत ठेकेदाराने
त्यांच्या खर्चाने नाल्यांच्या प्रवाहातील अडथळे दूर करावेत. नाल्यांतील गाळ काढावा आणि प्रवाह सुरळीत करावा, अशी अट प्रशासनाने ठेकेदाराला घातली आहे. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा जलद होऊन त्या भागात पाणी साचणार नाही, असा पालिकेचा दावा आहे.
>ही कामे केली जाणार
पुरातून सुटका करण्यासाठी वर्सोवा, जेव्हीपीनगर, अंधेरी (पश्चिम), जोगेश्वरी (पश्चिम), लोखंडवाला, सिटी इंटरनॅशनल आदी ठिकाणी पर्जन्यवाहिन्या आणि कल्व्हर्टची कामे करण्यात येतील. या भागातील रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या यांचीही कामे
करण्यात येतील. मेसर्स कमला कन्स्ट्रक्शन यांना पूरनियंत्रणाचे काम देण्यात येणार आहे.