मुंबई - अंधेरी येथील एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला सोमवारी लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास १४० जण जखमी झाले होते. या प्रकरणातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून काल रात्री १२. २० वाजता होली स्पिरिट रुग्णालयात एका आठवड्यापूर्वी जन्मलेल्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारी शीला मोर्वेकर (वय ६५), गुरुवारी दत्तू नरवडे (वय ६५) यांचा होली स्पिरिट रुग्णालयात मृत्यू झाला होता.
दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना बुधवारी (20 डिसेंबर) बेड्या ठोकल्या आहेत. प्राथमिक तपासात या दोघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंता नीलेश मेहता आणि सहायक अभियंता नितीन कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच रुग्णांना इमारतीमध्ये प्रवेश का दिला होता?, याबाबत त्या दोघांकडे चौकशी सुरू आहे. दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ10चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.
अंधेरीच्या कामगार हॉस्पिटल मधील मृतांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर