मुंबई : अंधेरी पश्चिम ते मानखुर्दला जोडणाऱ्या ‘मेट्रो २ ब’ मधून मुंबईकरांना पुढच्या वर्षी प्रवास करता येणार आहे. या मेट्रो मार्गिकेचे काम जोरदार सुरू असून, या मार्गिकेतील मंडाळे ते चेंबूर असा टप्पा २०२४ मध्ये वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावर धावण्यासाठी मेट्रोने बंगळुरू येथून गाड्या मागवल्या असून, मंडाळे येथील कारशेडमध्ये ३ गाड्या दाखल झाल्या आहेत.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई शहर उपनगरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडण्यासाठी ‘मेट्रो २ ब’ची उभारणी केली जात आहे. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार ‘मेट्रो २ ब’अंतर्गत अंधेरी पश्चिम ते मंडाळे असा करण्यात येणार असून, २३.६४ किमी लांबीच्या या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी मंडाळे मानखुर्द येथे ३१ हेक्टर जागेत कारशेड उभारण्यात येत आहे.
एकाचवेळी ७२ गाड्या उभ्या राहणार
मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवर धावणाऱ्या गाड्यांची बांधणी याच कंपनीने केली आहे. आता ‘मेट्रो २ ब’च्या तीन गाड्या मंडाळे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. आणखी काही गाड्या टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत.
लाल निळ्या मेट्रो गाड्यांची जोडणी करूनच चाचणी होणार
बंगळुरूतील भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड कंपनीने या गाड्यांची बांधणी केली असून, या कारशेडमध्ये सध्या आलेल्या लाल आणि निळ्या रंगांच्या मेट्रो गाड्यांची जोडणी करून चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.