गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - चालत्या रिक्षातून वृद्धेची पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न दोन मोटरसायकलस्वारांनी रविवारी (28 ऑक्टोबर) रात्री केला. या खेचाखेचीत रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षाच उलटली.अंधेरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, बॅग चोरुन फरार झालेल्या मोटरसायकलस्वारांचा शोध पोलीस घेत आहेत.उमा ( नावात बदल ) या ६५ वर्षीय महिला रविवारी दिल्लीहून मुंबईत परतल्या. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रिक्षाने त्या अंधेरी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून बोरिवलीतील त्यांच्या घरी निघाल्या होत्या. मांडीवरच त्यांनी पैशांची बॅग ठेवली होती. त्याचवेळी अंधेरी परिसरात साई सर्व्हिसजवळ एक मोटरसायकल त्यांच्या रिक्षाच्या जवळ आली. उमा यांना काही समजण्यापूर्वीच त्यांची बॅग त्या मोटरसायकलस्वारांनी उचलली. सतर्क झालेल्या उमा यांनी ती बॅग घट्ट पकडली. तेव्हा मोटरसायकलस्वारांनी दुचाकीचा वेग वाढवत त्यांची बॅग घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र उमा यांनी ती बॅग सोडली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही झटापट जवळपास पाच मिनिटे सुरू होती. अखेर या सगळ्यात रिक्षाचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा अक्षरशः उलटली. तसेच मोटरसायकलस्वारही उमा यांची बॅग घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. त्या बॅगमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख 10 हजार रुपये होते. या अपघातात उमा आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्या अज्ञात मोटरसायकलस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
'आम्ही घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहत आहोत. तसेच अशीच कार्यपद्धती असलेल्या अभिलेखावरील गुन्हेगारांकडे देखील चौकशी सुरू आहे', अशी माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.