अंधेरी-सीप्झ प्रवास झाला ‘कूल’; बेस्टच्या १० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:29 AM2023-12-12T09:29:05+5:302023-12-12T09:29:05+5:30
मुंबई उपनगरांची गरज लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाकडून कुर्ला, बीकेसी या भागात एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: मुंबई उपनगरांची गरज लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाकडून कुर्ला, बीकेसी या भागात एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, याचाच भाग म्हणून अंधेरीमधील प्रवाशांनाही बेस्टचा गारेगार प्रवास देण्याचे बेस्ट उपक्रमाकडून ठरविण्यात आले आहे.
यामुळे अंधेरी ते सीप्झ प्रवास ठंडा ठंडा...कुल कुल...होणार आहे. याअंतर्गत १० एसी इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या ३३२ या बसमार्गावर कुर्ला बस आगार ते अंधेरी पूर्वच्या ४१५ या बसमार्गावर आगरकर चौक (अंधेरी पूर्व) ते सीप्झ टर्मिनस या दरम्यान सुरु करण्यात येणार आहेत.
पर्यावरणपूरक गाड्या :
या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायुप्रदुषण होत नाही. सदर बसमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वारे असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्ही आणि मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.
मुंबईकरांचा बेस्ट प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी उपक्रमाच्या ताफ्यात २१ फेब्रुवारीपासून वातावरणपूरक एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सध्या एकूण ४५ इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या दाखल झाल्या असून, त्यापैकी २० बसगाड्या दक्षिण मुंबईत सुरू करण्यात येत आहेत. १० बसगाड्या मुंबई उपनगरामध्ये ३१० या बसमार्गावर वांद्रे बस टर्मिनस ते कुर्ला स्टेशन पश्चिम बसस्थानक या दरम्यान सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय आता आणखी १० अंधेरी ते सीप्झ सुरू करण्यात आल्या आहेत.