Join us

काँग्रेसचा अंधेरी पश्चिम बालेकिल्ला धोक्यात !

By admin | Published: September 23, 2014 2:20 AM

विद्यमान आमदार अशोक जाधव यांच्याविरोधातील कमालीचा नाराजीचा सूर, मतदारसंघावर राष्ट्रवादीने केलेला दावा

मुंबई : विद्यमान आमदार अशोक जाधव यांच्याविरोधातील कमालीचा नाराजीचा सूर, मतदारसंघावर राष्ट्रवादीने केलेला दावा व विरोधकांची सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी यामुळे अंधेरी पश्चिमचा गड काँग्रेसच्या हातातून निसटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़या मतदारसंघात एसआरए, नाल्यांचा प्रश्न, पाणीप्रश्न अशा अनेक समस्यांनी नागरिक हैराण आहेत़ गेल्या पाच वर्षांत या समस्या सुटण्याऐवजी वाढल्या आहेत. आमदार जाधव विकासकामे करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधक करत आहेत. जाधव यांनी विकासकामांच्या उद्घाटनांचा सोहळा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केल्याचाही आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेस पक्षातील दोन मोठे नगरसेवक आमदार जाधव यांच्याविरोधात असल्याचे खासगीत एका कार्यकर्त्याने सांगितले़ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबण्णा कुशाळकर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत़ राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे त्यांनी तिकिटासाठी फिल्ंिडगही लावली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता कमी असली तरी कुशाळकर यांचे उपद्रवमूल्य मोठे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे जागा न आल्यास आघाडीचा काँग्रेसला किती फायदा होईल, यावर प्रश्नचिन्हच आहे. तर दुसरीकडे युतीचा उमेदवार येथून जाहीर झाला नसला तरी आमदार जाधव यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत विभागाचा काहीही विकास झालेला नाही, या मुद्द्यावर शिवसेना प्रचारात रान उठवणार आहे़मनसेकडून येथून रईस लष्करिया हे इच्छुक आहेत़ त्यामुळे या मतदारसंघात लढत चुरशीची ठरणार असून विद्यमान आमदार अशोक जाधव गड कसा राखणार, हा खरा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)