गोखले पुलावरून जायचंय? अजून महिनाभर थांबा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:40 AM2024-01-31T10:40:51+5:302024-01-31T10:45:30+5:30
पालिकेची तारीख पे तारीख, २३ फेब्रुवारीला अवजड वाहनांची चाचणी
मुंबई : गोखले पुलावरील एक मार्गिका फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्याचा पालिका प्रयत्न करत असून त्या दिशेने पालिकेची कामे सुरू आहेत. एका मार्गिकेचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत मार्गिकेची लेन टेस्टिंग आणि अवजड वाहतुकीसाठीची चाचणी पार पडेल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेकडून यावेळी तरी पूल सुरू करण्याच्या तारखेत बदल होणार नसल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा पूल बंद झाल्याने अंधेरीतील वाहतूककोंडी वाढली आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने यापूर्वी पुलाची एक बाजू खुली करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, अनेक कारणांमुळे कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे त्यांची १५ फेब्रुवारीच्या मुदत हुकणार असल्याने अंधेरीतील स्थानिकांनी आयुक्तांना पत्र लिहिले. शिवाय नागरिकांनी आयुक्तांनी पत्र लिहूनही अजून गोखले पुलाच्या दैनंदिन कामाची माहिती स्थानिक नागरिकांपर्यंत पोहाेचत नसल्यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
वाहनासाठीची चाचणी :
२३ फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण होणार पुलाच्या काँक्रिटीकरणानंतर १९ फेब्रुवारीपर्यंत पुलाच्या भिंतींची रंगरंगोटी, स्ट्रीट लायटिंग, दिशादर्शक फलक, अशी कामे पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर पुलाच्या सुरू होणाऱ्या मार्गिकेची अवजड वाहनासाठीची सुरक्षा चाचणी पार पडेल, अशी माहिती पालिका प्रशासनकडून स्थानिक आमदार अमित साटम यांना देण्यात आली.
वरिष्ठ अधिकारीच नाही :
गोखले पुलाचे काम चांगल्या गतीने सुरू असले तरी पुलाच्या दैनंदिन कामाची महिती स्थानिक नागरिकांपर्यंत पोहाेचवावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत. या शिवाय अजूनही पुलाची देखरेख व कामाच्या नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती पालिकेकडून करण्यात आलेली नाही ती लवकर करावी, असे स्थानिक अधोरेखित करत आहेत. शिवाय नागरिकांनी पुलाच्या नोंदविलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करावी, असेही नमूद केले आहे.