सौरभ त्रिपाठीने जामिनासाठी घेतली सत्र न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 01:10 PM2022-03-20T13:10:03+5:302022-03-20T13:11:03+5:30

व्यवसायाला परवानगी हवी असल्यास दर महिनाला १० लाखांची मागणी सौरभ त्रिपाठी यांनी केली, असा आरोप अंगडिया असोसिएशनने केला आहे.

Angadia extortion case: DCP Saurabh Tripathi files anticipatory bail plea in Mumbai court | सौरभ त्रिपाठीने जामिनासाठी घेतली सत्र न्यायालयात धाव

सौरभ त्रिपाठीने जामिनासाठी घेतली सत्र न्यायालयात धाव

Next

मुंबई:  अंगडिया प्रकरणातील आरोपी पोलीस उपायुक्त (डीसीपी) सौरभ त्रिपाठी याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर येत्या २३ मार्च रोजी सुनावणीसाठी होणार आहे. त्याच्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा त्याच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

व्यवसायाला परवानगी हवी असल्यास दर महिनाला १० लाखांची मागणी सौरभ त्रिपाठी यांनी केली, असा आरोप अंगडिया असोसिएशनने केला आहे. सदर खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने (सीआययू) नुकतेच नव्या खुलाशांचा हवाला देत त्रिपाठीचे नाव या प्रकरणात पाहिजे आरोपी म्हणून घोषित केले आहे. महानगर दंडाधिकारी न्यायालयात १५ मार्च रोजी या प्रकरणाच्या सुनावणीत, गुन्हे शाखेने न्यायालयाला माहिती दिली होती की, त्रिपाठीला इतर आरोपींच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. 

गुन्हे शाखेच्या टीमने कोर्टाला असेही सांगितले की, त्रिपाठीवर १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून तो गैरहजर होता. त्याची परिमंडळ २ मधून परिमंडळ (ऑपरेशन्स) या पदावर बदली करण्यात आली होती. त्याने अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही. म्हणूनच त्याचा पाहिजे आरोपी म्हणून शोध सुरू आहे. 

त्रिपाठी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल करणारे ॲड. अनिकेत निकम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान त्रिपाठी याचे नाव कधीही समोर आले नसल्याने त्यास या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यानुसार याप्रकरणी २३ मार्च रोजी सुनावणी होईल. यापूर्वी अंगडिया ऑपरेटरकडून १५ ते १८ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे आणि ओम वंगाटे या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करीत नंतर त्यांना एलटी मार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आली.

२३ मार्च रोजी होणार सुनावणी
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, अंगडिया असोसिएशनने मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याशी संपर्क साधला. त्रिपाठी याने व्यवसाय सुरू ठेवण्याच्या परवानगीसाठी १० लाखांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यानंतर नागराळे यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांची नियुक्ती केली. सावंत यांच्या तक्रारीवरून एलटी मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Angadia extortion case: DCP Saurabh Tripathi files anticipatory bail plea in Mumbai court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.