लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बसमध्ये बसलेल्या अंगडीयाच्या मांडीवर ठेवलेले ४६ लाख ५० हजारांचे दागिने घेऊन एक टोळी पसार झाली होती. मात्र अंधेरी पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी सात जणांच्या टोळीला गुरुवारी अटक केली.
महेंद्र मोरे, मनोश मेढे, आमीन शेख, शशिकांत कोलवालकर, विजयकुमार गुप्ता, मनीष दर्जी आणि शैतानसिंह राजपूत अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै, २०२१ रोजी मधुकर काविनकर यांनी अंधेरी पोलिसात येऊन तक्रार केली. ज्यात दहिसरवरून ते झवेरी बाजार येथे ४६ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन व्यापाऱ्याला द्यायला निघाले होते. त्यावेळी टोळीचा म्होरक्या शेख याने काविनकर यांच्या सीटजवळ घोळक्याने उभे राहत दागिन्यांची बॅग हिसकावत पळ काढला. तसेच स्वतःच साथीदारांसह चोर चोर म्हणत पाठलाग करू लागला. कविनकरांची दिशाभूल करत भलत्याच दिशेला चोर पळाल्याचे सांगत त्यांना रिक्षात बसून दिले. याप्रकरणी परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी आणि अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीला अटक करण्यात आली.