Join us

अंगणवाडी समितीचे बेमुदत उपोषण सुरू; मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास आज जेल भरो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 7:09 AM

मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. 

मुंबई : ऑगस्ट महिन्यामधील आंदोलनानंतर राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना ३ हजार आणि त्यांच्या मदतनिसांना २ हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाकडून घेण्यात आला होता. वित्त विभागाकडून वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. 

सोमवारी सकाळी आझाद मैदानावर ४२ आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून अंगणवाडी सेविका आल्या आहेत. संध्याकाळी समितीचे शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. आता मागण्यांबाबत सरकारने हालचाल न केल्यास संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी अंगणवाड्या बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

उद्या अंगणवाड्या बंद

मुंबईसह सर्व जिल्ह्यांतील अंगणवाड्या २५ सप्टेंबरला बंद ठेवण्यात येणार आहेत. आहार, पोषण ट्रॅकर, ऑनलाइन काम, अन्य योजना अशी कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिली.

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदे